www.24taas.com, नवी दिल्ली
देशातली सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होपरळत असताना केंद्रीय पोलाद मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांनी बेताल वक्तव्य केलयं. महागाईमुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचा अजब शोध त्यांनी लावलाय. इतकंच नाहीतर महागाईमुळं आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. बेनीप्रसादांच्या या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलयं.
रविवारी, बेनी प्रसाद वर्मा यांनी आपल्याला महागाई वाढल्यानं आपल्याला आनंद झाल्याचं म्हटलंय. महागाई वाढल्याचा फायदा गरिब शेतकऱ्यांना होईल, असा तर्कही त्यांनी मांडलाय. ‘डाळ, गहू, तांदूळ आणि भाज्या चांगल्याच महागल्यात. पण, वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल’ असं वक्तव्यं बेनी प्रसाद वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.
बेनीप्रसाद वर्मांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काँग्रेस ‘आम आदमी’पासून दूर गेल्याची टीका भाजपनं केलीये. तर बेनीप्रसादांचे अजब अर्थशास्त्र असल्याची टीका राजदनं केली आहे.