www.24taas.com, झी मीडिया, गाझियाबाद
वाढत्या महागाईची झळ सर्वांनाच पोहचताना दिसतेय. महागाईमुळे अनेक जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचं धाडस केलंय. अशीच एक घटना रविवारी गाझियाबादमध्ये घडली.
गाझियाबादमध्ये आपल्या कुटुंबियासहीत राहणाऱ्या वसीम नावाच्या एका व्यक्तीनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय. वसीमच्या मागे त्याच्या चार पत्नी आणि २० मुलं असा मोठा परिवार आहे.
महागाई आणि वाढत जाणारं कर्ज यांना कंटाळून वसीमने स्वत:वर गोळी झाडून घेतली. `वसीमचा मोठा परिवार, वाढतं कर्ज आणि व्यवसायात आलेलं अपयश हे त्याच्या आत्महत्येमागं कारण असावं` असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
आत्महतेपूर्वी वसीमने आपल्या सगळ्या कुटुंबीयांना एकत्र बोलवून त्याच्यावर असलेलं कर्ज आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती याची जाणीव करून दिली होती.
चार पत्नी आणि २० मुलांची जबाबदारी एकट्या वसीमवर होती. बिझनेस बुडत चालला होता आणि कुटुंबावरचं कर्जाचं ओझं वाढतच चाललं होतं. त्याला कोणताच मार्ग मिळत नव्हता, म्हणून त्याने आत्महत्या केली, असं वसीमच्या शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसीमने मारलेली पहिली गोळी चुकून घराच्या बाहेर गेली... मात्र, त्याने झाडलेली दुसरी गोळी त्याच्या डोक्याला आरपार छेदून गेली.
त्यानंतर त्याला तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं... पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी वसीमच्या दोन पत्नी आणि एक भाऊ उपस्थित होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.