www.24taas.com, हैदराबाद
हैदराबाद दिलसुखनगर बॉम्बस्फोटांना ४० तासांहून अधिक वेळ लोटलाय. तपासयंत्रणा या स्फोटांचा मागमूस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, हाती आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या एका सायकलस्वारावर पोलिसांचा संशय बळावलंय.
हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर पडताळलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये ही व्यक्ती दिसून आलीय. फुटेडमध्ये सुमारे ३० वर्षीय एका व्यक्तीला गुरुवारी (बॉम्बस्फोटाच्या दिवशी) सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी सायकलवर जाताना आढळला. जेव्हा तो तिथून गेला तेव्हा त्याच्या सायकलवर एक बॅग लोंबकळलेली होती. पण, जेव्हा तो तिथून परतला तेव्हा त्याच्या सायकलवर ही बॅग नव्हती. त्यामुळे या व्यक्तीवर पोलिसांचा संशय बळावलाय. या व्यक्तीनं हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता.
स्फोटाच्या परिसरात अर्धा तास आधीपासून पोलीस उपस्थित
स्फोटांचे धागेदोरे बिहारच्या दरभंगाशी जोडले असण्याची शक्यता वर्तवली जातेय... एनआयएची टीम तिथं जाणार असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, या स्फोटांचं वृत्त सगळ्यात आधी ‘झी २४ तास’ आणि ‘झी न्यूज’नं दाखवलं होतं. दिलखुखनगरच्या साईमंदिरांचं सीसीटीव्ही फुटेजही आम्ही दाखवलं होतं. आता आम्हाला या स्फोटांच्या एक तासाआधीचं फुटेज मिळालंय. या फुटेजमध्ये अनेक भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र, या अनेक भक्तांमध्ये हैदराबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मासुद्धा आहेत. स्फोटांच्या २३ मिनिटआधी शर्मा मंदिरात होते. साऱ्या अधिकाऱ्यांसह ते या परिसरात होते. त्यामुळं दहशतवाद्यांना पोलिसांचा धाक राहिलाय का? असा प्रश्न आता यामुळं उपस्थित होतोय.