www.24taas.com, झी मीडिया, डिब्रूगढ/आसाम
आसामच्या डिब्रूगढमधील मेडिकल कॉलेज (एएमसीएच) मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आयसीयूमध्ये हत्या करण्यात आलीय. तिथल्याच वार्ड बॉयनं ही हत्या केल्याचं कळतंय. यानंतर हॉस्पिटलच्या सर्व ज्यूनिअर डॉक्टर्सनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सरिता तसनीवालचा मृतदेह आज सकाळी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये असलेल्या डॉक्टर्ससाठी असलेल्या विश्रांती कक्षात सापडला. तिच्या गळ्यावर उजव्या बाजूला ऑपरेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या सुरीनं चिरलेला होता.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या सुमारास नर्सेसनी आयसीयूमध्ये सरिताचा मृतदेह पाहिला. सरिता रात्रपाळीत होती, तिची ड्यूटी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत होती.
तिथल्या स्थानिक डॉक्टर्सनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी पाच वाजेपर्यंत सरिता काम करत होती आणि त्यानंतर ती विश्रांती कक्षात गेली. याप्रकरणी आयसीयूतील वार्डबॉय खीरू मेकसह चार जणांना पोलिसांनी अटक केलीय. खीरूनं सरिताची हत्या केल्याचं त्यानं कबुल केलंय.
डॉ. सरिता आब्सट्रेट्रिक्स आणि गाइनेकोलोजीची एमडीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. याप्रकरणामुळं आता ज्यूनिअर डॉक्टर आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झालाय. त्यांना सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी डॉक्टर्स संपावर गेले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.