www.24taas.com, नवी दिल्ली
अखेर गुरूवारी किंगफिशर एअरलाईन्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाटाघाटी झालीय. या वाटाघाटीनुसार आजपासून म्हणजेच गुरुवारपासून सुट्टीवर गेलेले कर्मचारी पुन्हा कामावर हजर होत आहेत. किंगफिशर एअरलाईन्स व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीनुसार आंदोलनात सहभागी असलेले इंजिनिअर्स गुरुवारपासून कामावर रुजू झालेत.
किंगफिशर एअरलाईन्सकडून गुरूवारी यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलीय. कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन २४ तासांच्या आत म्हणजेच गुरुवारी मिळणार असल्याचं किंगफिशरच्या प्रवक्यानं म्हटलंय. वाटाघाटीनुसार, कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचं वेतन दिवाळीच्या आधी दिलं जाईल. तसंच उरलेल्या महिन्यांचं वेतन कंपनीची स्थिती सुधारताच देणार असल्याचंही यावेळी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलंय.
परंतू, किंगफिशर एअरलाईन्सच्या विमानांची रद्द झालेली उड्डाण नेमकी कधीपासून सुरू होणार यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. डीजीसीएनं किंगफिशरचं लायसन्स तात्पुरतं रद्द केलेलं आहे.