मेरठ : रस्त्यावरून जाताना मुलींना छेडणं किंवा त्यांची खोड काढणं या गोष्टी काही नवीन राहिलेल्या नाहीत. कारण, समोरची मुलगी रस्त्यावर आपल्याला प्रतिकार करेल, असं कित्येकांच्या ध्यानीमनीही नसतं... पण, मेरठच्या एका ‘मर्दानी’नं एकटीनंच रस्त्यावर एका टोळक्याला बुकलून काढलं...
त्याचं झालं असं, की मेरठमध्ये रहदारीच्या रस्त्यावर एक कार आणि एका बाईकची टक्कर झाली. बाईकवर एक वयस्कर व्यक्ती त्याच्या मुलीसोबत जात होते... बाईकची ठोकर बसल्यानंतर गाडीत बसलेल्या टोळक्यानं खाली उतरून बाईकवर बसलेल्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात केली.
यावेळी, आजुबाजुला अनेक लोक रस्त्यावर उभं राहून ही हाणामारी पाहत होते... पण, कुणीही ती थांबवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही. धक्कादायक म्हणजे, ही घटना घडत असताना एक होमगार्डही इथं उभा राहून हा सगळा तमाशा पाहत होता.
आपल्या वडिलांना होणारी मारहाण आणि लोकांची उदासिनता पाहून मुलगीच बापासमोर ढाल बनून उभी राहिली... आणि तिनं या सहा जणांच्या टवाळ टोळक्याला बुकलून काढायला सुरुवात केली. असं काही होईल, याचा विचारही मनात नसताना या ‘मर्दानी’ला पाहून या टोळक्याला इथून पळ काढावा लागला. या मेरठच्या 'मर्दानी'च्या धाडसामुळे उपस्थित अनेक जणांनी तोंडात बोटं घातलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.