www.24taas.com, झी मीडिया, केवंडी (गुजरात)
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्तानं आज गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘द स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची पायाभरणी केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी लोहपुरुषाला श्रद्धांजली अर्पित करत ‘पटेलांसारख्या मोठ्या व्यक्तीला कोणत्याही पक्षाशी जोडणं चुकीचं ठरेल... त्यांच्या आयुष्याचं मोठेपण देशाच्या गौरवाशी जोडलं गेलंय’ असं म्हटलंय.
‘३१ ऑक्टोबरला सरकारी जाहिरातींत सरदार पटेल नव्हते... आता सरकारला पटेलांची का गरज पडली? हा गुजरात इफेक्ट आहे...’ असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातोय. यासंबंधी बोलताना ‘हा जगातील सर्वात मोठा पुतळा ठरेल... सरदार पटेलांनी लोकांना जोडण्याचंच काम केलं... त्यामुळे भारत एकतेचा संदेश देणारा देश म्हणून ओळखला जाईल’ असंही मोदींनी म्हटलंय. सरदार पटेल यांचा गुजरातमध्ये १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याला ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ असं नावही देण्यात आलंय.
‘आमचं स्वप्न हे केवळ गुजरातसाठी नाही. सरदार साहेबांनी सगळ्यांना जोडण्याचं काम केलं... कुणालाही तोडलं नाही. याच वारशाचा लोकांना गर्व असायला हवा. आज या देशाला पटेलांच्या सेक्युलॅरिजमची गरज आहे केवळ व्होटबँकेच्या सेक्युलॅरिजमची नाही’ असंही भाजपच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांनी म्हटलंय.
‘सरदार पटेलांच्या पुतळ्याची पायाभरणीचा आजचा ही ऐतिहासिक घटना आहे. गेल्या २३ वर्षांपासूनचं हे माझं स्वप्न आहे. या कार्यासाठी मला अनेकांनी प्रेरणा दिली. या पुतळ्याच्या साहाय्यानं आम्हाला गाव-गाव एकमेकांना जोडायचंय’ असं भावनिक आवाहनही मोदींनी यावेळी केलंय. यावेळी राजकीय अस्पृश्यता संपवण्याचीही गरज असल्याचं मोदींनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.