नवी दिल्ली: नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बेपत्ता होण्यामागे मोठा कट होता, असा आरोप आरएसएसचं मुखपत्र 'ऑर्गनायझर'नं केलाय. त्यांनी मोदी सरकारकडे नेताजींच्या मृत्यूचं गुढ उकलण्यासाठी पाऊल उचलावं अशी मागणी केलीय.
संघाच्या या मुखपत्रात 'मदर ऑफ ऑल कंसपरेसीज' या मथळ्याखाली आलेल्या लेखामध्ये म्हटलंय, "अशाप्रकारचे अनेक कट नेहरू-गांधी परिवाराशी निगडित आहेत. काँग्रेस पक्ष खासकरून नेहरू-गांधी कुटुंबाला नेताजी आणि विविध विचारधारा असलेल्या इतर नेत्यांवरील प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतील. हास्यास्पद बाब म्हणजे, हेच नेहरू-गांधी कुटुंबाचे वंशज लोकशाही आणि भारतात सहिष्णुतेचा दावा करतात."
आणखी वाचा - कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी
आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलंय की, "नेताजींच्या मृत्युचं गूढ उकलण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं नाही तर भविष्यात दुसरं कुणी ते करू शकणार नाही. नेताजींच्या मृत्युचं हे गूढ नेहमीसाठी गूढच बनून राहिल." हा लेख नेताजी संबंधित फाईल्स बंगाल सरकारनं सार्वजनिक केल्यानंतर आलाय.
लेखकानं म्हटलंय, "सरकारला नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला याची चौकशी करायला हवी, मला विश्वास आहे सत्य काय ते अखेर समोर येईल."
नेताजी आपल्या क्रांतिकारी उत्साह आणि आपल्या आंतरराष्ट्रीय उंचीमुळं स्वातंत्र्य संघर्षादरम्यान नेहरूंपेक्षा अधिक लोकप्रिय होते.
लेखात म्हटलंय, "निर्वासित असतांना त्यांनी भारतातील पहिल्या स्वतंत्र सरकारची स्थापना केली होती. त्याला 11 देशांनी पाठिंबा दिला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर या स्मृति इतिहासातून मिटविण्यात आल्या." लेखक पुढे म्हणतात,"एकीकडे नेहरूंनी भारतात नेताजींच्या प्रवेशावर बंदी घातली होती. मात्र सोबतच हा प्रश्न निर्माण होतोय की, नेताजी आणि आयएनएचा पैसा कुठे गेला. नेताजी सिंगापूरला लॉर्ड माउंटबेटनच्या विनंती वरून गेले आणि बँकेच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली. पण ते का? हे अजूनही एक रहस्य आहे."
आणखी वाचा - नेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?
"आम्हाला पैसा णि दागिने जे दक्षिण पूर्व आशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी नेताजींना दान केले होते, त्याबद्दलही माहिती मिळवायला हवी.",असं ऑर्गनायझरमध्ये छापून आलेल्या लेखात म्हटलंय. लेखक पुढे म्हणतात, "ही दुख:द बाब आहे, ज्या व्यक्तीनं स्वातंत्र्यासाठी भारतीयांना रक्त मागितलं ते आपला अखेरचा श्वास मातृभूमीवर घेऊ शकले नाही. त्यांच्या कुटुंबियांची हेरगिरी करण्यात आली आणि स्वतंत्र भारतात त्यांना गुन्हेगार मानलं गेलं. नेताजींवरील फाईल्स सार्वजनिक केल्यानंतर या बाबी स्पष्ट होतात."
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.