www.zee24tass.com, झी मीडीया, दिल्ली
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.
महिमानं कागद बनवण्यासाठी झाडं न कापता, हत्तीच्या शेणापासून कागद बनवण्याचा व्यवसाय चालू केलाय. `हाथी छाप` कंपनीची ती संस्थापक आहे.
हत्तीचंच शेण का?
महिमाला हा प्रश्न विचारला असता, तिनं सांगितले की, ती जयपूरला राहायची आणि तिथं खूप हत्ती आहेत. एकदा महिमा आणि तिचा पती विजेंद्र शेखावत जयपुरच्या आमेर किल्लाच्या आजू-बाजूला फिरत होते. तिथं विजेंद्रचा पाय हत्तीच्या शेणात पडला. पहिले दोघांनी खूप विचित्र चेहरे केले, मात्र विजेंद्रच्या लक्षात आलं की, हत्तीच्या शेणात फायबर आहे त्या फायबरचा वापर होऊ शकतो. `इंटरनेटवर सर्च केल्यावर कळलं की, काही देशांत हत्तीच्या शेणापासून कागद बनवला जातो`.
महिमाची कंपनी शुभेच्छा कार्ड, वही, पिशवी, फोटो असे सजावटीचे सामान बनवते. महिमाच्या उत्पादनाला जास्तीत जास्त मागणी मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई मधून आहे. तसंच प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये कंपनीची दुकानं आहेत. जवळजवळ ४० दुकानात तिच्या कंपनीच्या या वस्तू विकल्या जातात. तसंच तिच्या कंपनीतील उत्पादनांची निर्यातही केली जाते. २००३ मध्ये १५,००० रुपयांनी कर्जाने सुरु झालेल्या या कंपनीचं उत्पादन आता १ कोटी रुपयांपर्यंत पोहचलंय.
कसा तयार होतो पेपर
कंपनीचे कर्मचारी गुणवत्ता टिकून राहावी म्हणून हत्तीच्या मालकांना चारा देतात आणि दररोज पहाटे हत्तीचं शेण एकत्र करतात. शेणातील रोगजंतू मारण्यासाठी त्याला गरम केलं जातं. शेणाला सुकवून त्यांचा लगदा बनवला जातो. प्रत्येक १००० किलो शेणापासून लगदा प्रक्रिया करुन १५० किलो लगदा तयार होतो. तयार झालेला लगदा आणि पाणी एकत्र करुन जाड कागदाची शीट बनवली जाते. त्यानंतर तयार कागद उन्हात सुकावला जातो. जेव्हा कागद नरम केला जातो, तेव्हा त्याला कापून, पॅक करुन बाजारात पाठवला जातो.
थायलंड हा हत्तीच्या शेणापासून कागद बनवणारा पहिला देश आहे. भारताशिवाय श्रीलंका आणि साऊथ आफ्रिकामध्येही हत्तीच्या शेणापासून कागद तयार केला जातो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.