बलात्काऱ्यांना तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही

आता बलात्कारांना समाजापासून तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही, कारण आता बलात्काराच्या आरोपात दोषी आढळलेल्या व्यक्तींचे फोटो बेवसाईटवर जाहीर करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 28, 2012, 09:57 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
आता बलात्कारांना समाजापासून तोंड लपवायलाही जागा मिळणार नाही, कारण आता बलात्काराच्या आरोपात दोषी आढळलेल्या व्यक्तींचे फोटो बेवसाईटवर जाहीर करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतलाय.
सध्या, कोर्टात हजर करण्यासाठीही बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व्यक्तीच्या तोंडावर कपडा टाकून त्याचा चेहरा समाजापासून लपवला जातो. त्यामुळे तो व्यक्ती शिक्षा भोगून आल्यानंतरही समाजात उजळ माथ्याने वावरू शकतो. त्यामुळे चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहचतो असं दिसून येतं. या दोषींचे चेहरे पाहून समाजातील इतरांनाही आपल्या ‘इमेज’बद्दल धाक राहावा यासाठी दिल्ली पोलिसांनी बलात्कारातील गुन्ह्यांची सर्व माहिती दोषी व्यक्तीच्या फोटोसह वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
देशभर बलात्काराच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि जनतेला कायद्यांची जाणीव राहावी यासाठी सरकारनं ही पावलं उचलली आहेत. राजधानी दिल्लीतून याची सुरुवात होईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री रणजीत प्रताप नारायण सिंग यांनी दिलीय. बलात्काराचे आरोप सिद्ध झालेल्या गुन्हेगारांचे फोटो, नावे आणि पत्ते दिल्ली पोलिसांच्या वेबसाईट (http://www.delhipolice.nic.in) वर अपलोड करण्यात येणार आहे. यासाठी आरोप सिद्ध झालेल्या दोषींची एक यादी तयार करण्यात आलीय. ही यादी नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोकडे सोपवण्यात आलीय. ही माहिती एनसीआरबीच्या वेबसाईटवर (http://ncrb.nic.in) दिसणार आहे. दिल्लीनंतर लवकरच ही मोहीम इतर ठिकाणीही लागू करण्यात येणार आहे.