www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असं सांगत आसाराम बापू निर्दोष आहे असं सांगणाऱ्या ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांची सोशल नेटवर्किंग साईटवर ‘छी...थू’ होताना दिसतेय.
जेठमलानी यांनी आसाराम यांना जामीन मिळवण्यासाठी संबंधित मुलगी एका आजाराची शिकार असून, त्या मानसिक विकृतीमुळं तिला परपुरुषाशी एकांतात भेटण्याची इच्छा होते. गेल्या सहा महिन्यांपासून ती या विकृतीची शिकार आहे आणि आमच्याकडे त्यासंबंधीचा रिपोर्टही आहे’, असा दावा केला होता. यावरून त्यांच्याविरोधात सोशल वेबसाईटवर जोरदार टीका होतेय.
स्त्री लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ‘ मुलीला रोग आहे, ज्यामुळे ती आपोआप पुरुषांकडे आकर्षित होते... म्हणून पुरुष तिच्यावर बलात्कार करून तिचा रोग बरा करतायत?’ असं म्हटलंय.
अनेकांनी जेठमलानींची तुलना दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींचे वकील ए पी सिंह यांच्याशी केलीय. ‘माझी मुलगी रात्री ११ वाजता आपल्या बॉयफ्रेंडबरोबर गेली असती तर मी तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं असतं’, असं ए. पी. सिंह यांनी नुकतंच म्हटलं होतं.
`ओपन मॅगझीन`चे असोसिएट एडिटर राहुल पंडिता ट्विट करताना म्हणतात, ‘माझ्याजवळ जेठमलानींसाठी एक उत्तम इलाज आहे, पण तो मी इथं शेअर करू शकता नाही, कदाचित कुणीतरी खरोखरच त्यांच्यावर हा उपाय करून पाहील’.
लेखक गौतम चिंतामणि म्हणतात, ‘राम जेठमलानी काही अशा बेडकांप्रमाणे आहेत, जे एक पाऊल पुढे टाकल्यानंतर दोन पावलं मागे सरकतात. ते आसारामच्या बचावासाठी काहीही म्हणू शकतात’.
आसाराम बापूंच्या जामीन अर्जावर जोधपूर कोर्टात सुनावणी पुढे ढकलली गेलीय. आसाराम यांची बाजू मांडताना जेठमलानी यांनी पीडित मुलगी अल्पवयीन नसल्याचाही दावा केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.