या सहा धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाही

धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत

Updated: Apr 1, 2016, 07:31 PM IST
या सहा धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाही title=

मुंबई: धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.

शनिशिंगणापूर इथल्या चौथ-यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना, न्यायालयानं हे स्पष्ट निर्देश दिले.

पण भारतामध्ये अशी आणखी 6 धार्मिक स्थळं आहेत जिथे आजही महिलांना प्रवेश मिळत नाही. 

हाजी अली दर्गा, मुंबई

मुंबईच्या हाजी अली दर्ग्याच्या आतील भागामध्ये महिलांना आजही प्रवेश दिला जात नाही. इस्लामचा दाखला देत मुस्लिम संतांच्या समाधीजवळ महिलांनी जाण म्हणजे पाप असल्याचा दावा हजी अली ट्रस्टच्या ट्रस्टींना मुंबई उच्च न्यायालयात केला. महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश मिळावा यासाठी महिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

हजी अली दर्ग्याप्रमाणेच दिल्लीच्या निजामुद्दिन दर्ग्यामध्येही महिलांना प्रवेश दिला जात नाही. 

अय्यप्पा मंदिर, सबरीमाला

सबरीमाला मंदिरामध्ये 10 ते 50 वर्षांपर्यंतच्या महिलांना प्रवेश दिला जात नाही. मासिक पाळी असताना महिलांनी मंदिरात जाऊ नये, असं कारण देत या सबरीमालामध्ये महिला प्रवेशाला बंदी आहे. 

सुप्रिम कोर्टानंही या प्रकरणामध्ये सबरीमाला मंदिराच्या समितीला खडे बोल सुनावले होते. देव कधीही महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही, मग मंदिरामध्ये असा भेदभाव का होतोय, असा प्रश्न सुप्रिम कोर्टानं विचारला. 

पद्मस्वामी मंदिर, केरळ

केरळचं पद्मस्वामी मंदिर हे हिंदूंचं जगभरातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराच्या चेंबरमध्ये महिलांना प्रवेश बंदी आहे. या मंदिराच्या निधीच्या हिशोब सुरु असतो त्या ठिकाणी महिलांना प्रवेश देऊ नये, असं सुप्रीम कोर्टाच्या समितीनं 2012 मध्ये सांगितलं. मंदिर समितीनं केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

पटबौसी सत्र, आसाम

पटबौसी सत्र या मंदिरामध्येही मासिक पाळीचं कारण देत महिलांना प्रवेश दिला जात नाही. 2010 मध्ये आसामचे राज्यपाल जे.बी. पटनायक आणि मंदिर समितामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर 20 महिलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आला. पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ही बंदी घालण्यात आली. 

कार्तिकेय मंदिर, पुष्कर

ब्रम्हचारी असलेल्या कार्तिकेयच्या मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश केला तर पाप लागतं असं कारण देत, पुष्करच्या कार्तिकेय मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाकारला जातो. 

रंकापूर मंदिर, राजस्थान

मार्बलपासून बनवलेल्या या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातले भाविक येतात. पण या मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशासाठी अटी ठेवण्यात आल्या आहेत. मासिक पाळीमध्ये महिलांनी मंदिरात येऊ नये, तसंच पाश्चिमात्य कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश करु नये, असे बोर्ड मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी महिलांनी गुडघ्यापर्यंत कपडे घालावेत असा नियम मंदिर प्रशासनानं घातला आहे. 

राजस्थान आणि मध्यप्रदेशमधल्या अनेक छोट्या मंदिरांमध्येही अशाच प्रकारे महिला प्रवेशाबाबत अटी घालण्यात आलेल्या आहेत.