नवी दिल्ली : नुकतंच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी हेरगिरी करणारी उपकरणं आढळून आल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. त्यामुळे, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंतप्रधानांपासून इतर नेत्यांनीह सतर्कता आणि सावधानी बाळगण्यास सुरुवात केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सुरक्षेत तैनात असलेल्या एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप)च्या सुरक्षा अधिकाऱ्यांना आपल्यापासून थोडं लांबच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, याच एसपीजी सुरक्षा अधिकाऱ्यांवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
उच्च सूत्रांच्या माहितीनुसार, एसपीजीचे कमांडोंना पंतप्रधांनांपासून दूर उभं राहण्याचे निर्देश यासाठी देण्यात आलेत जेणेकरून मोदींची कोणतीही गोपनीय माहिती ते ऐकू शकणार नाहीत. एक घटना निदर्शनास आल्यानंतर मोदींनी हे आदेश दिलेत असंही सांगण्यात येतंय...
असंही सांगण्यात येतंय की, पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्यावर, ड्युटीदरम्यान पंतप्रधानांच्या गोष्टी ऐकण्याचा आणि त्या इतरांना सांगण्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या घटनेच्या खुलाशानंतर त्या आयपीएस अधिकाऱ्याला एसपीजीतून परत मूळ कॅडरमध्ये धाडण्यात आलं. मोदींच्या सगळ्यात जवळच्या सुरक्षा टीममध्ये एसपीजीचे 6 ते 8 कमांडो नेहमी तैनात असतात.
दुसरीकडे, मोदींचे जवळचे सहकारी मात्र भलतेच खूश आहेत. आता, मोदींच्या जवळ उभं राहून त्यांच्याशी सहज बोलता येईल, म्हणून त्यांना आनंद झालाय... आणि याचसाठी मोदींनी एसपीजीला लांब उभं राहण्याचे निर्देश दिले असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.