www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली गँगरेप प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणात ठोस पावलं उचलली जातील, असं आश्वासन बुधवारी राज्यसभेत दिलंय.
आत्तापासून प्रत्येक बसवर चालकाचं नाव लिहिणं अनिवार्य राहणार आहे तसंच प्रत्येक बस चालकाचं व्हेरिफिकेशन केलं जाईल, अशी घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत केलीय. त्याचप्रमाणे आत्तापासून बसवर मोबाईल नंबर आणि त्याचं लायसन्स नंबर लिहिणंही बंधनकारक असणार आहे. बसच्या काळ्या काचा आणि पडदे हटवण्याचे आदेश देण्यात आलेत तसंच रात्रीच्या वेळी प्रत्येक बसमध्ये लाईटस् चालू ठेवणं यापुढे बंधनकारक असणार आहे. कोणत्याही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बसचं परमिट रद्द करण्यात येईल, असं शिंदे यांनी म्हटलंय.
दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर डीसीपींच्या देखरेखीखाली स्पेशल इन्हेस्टीगेशन टीमची (एसआयटी) स्थापना करण्यात आलीय. ही समिती तातडीनं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करणार आहे. तसंच महिला आयपीएस ऑफिसर पीडित मुलीच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवणार आहेत.