नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचं नवी दिल्लीत विमानतळावर स्वागत केलं.
शेख मोहम्मद बीन झायेद तिन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर उद्या ते व्यापार, गुंतवणुक, सुरक्षा अशा विविध मुद्यांवर चर्चाही करणार आहेत. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांमध्ये काही करारही होणार आहेत. पंतप्रधान मोदींनीही ट्विट करुन दोन्ही देशांबरोबर मित्रत्व आणि सहकार्याचं बंध आणखी घट्ट होतील, असं म्हटलंय.
दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सैन्याबरोबर संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे जवान देखील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांचे 144 जवान आणि 35 बँण्ड पथकातील जवान परेडमध्ये सहभागी होणार आहेत. फ्रान्स नंतर युएई दुसरा देश आहे जो राजपथावरील परेडमध्ये सहभागी होतोय. 2016 मध्ये फ्रान्सचं पथक परेडमध्ये सहभागी झालं होतं.