www.24taas.com, मेलबर्न
अलकायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मृतदेह गुजरातमधील सुरत पासून ३२० किलोमीटर अंतरावर सापडल्याचा दावा कॅलिफोर्नियाच्या ट्रेजर हंटर्सने केला आहे.
अमेरिकेच्या नौदलाने जारी केलेल्या फोटोंचा हवाला देत बिल हंटरने ओसामा बिन लादेनला खोल समुद्रात दफन केल्याचा दावा केला आहे. ओसामा बिन लादेनचा मृतदेह हलविता येत नाही, कारण तो एका जड अशा बॅगेत भरला असल्याचाही दावाही या हंटर्सने केला आहे.
ओसामाला ठार केल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी समुद्रात फेकण्यात आले, त्या ठिकाणाचा आम्ही शोध घेतल्याचे शोधकर्त्याने एका स्पॅनिश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
माझ्या एकट्याकडे ही माहिती आहे, ओसामाला सुरतपासून ३२० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोल समुद्रात फेकले असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. ओसामा बिन लादेन याला ठार मारले असून तो जिवंत नाही, हे मला जगाला दाखवून द्यायचे होते, त्यामुळे यामागे माझे हेतु शुद्ध आणि वैयक्तिक असल्याचे बिल हंटरने सांगितले. आम्ही देशभक्त अमेरिकी नागरिक आहोत, ओसामाला ठार मारल्याचे कोणतेही पुरावे सादर करण्यात राष्ट्राध्यक्ष ओबामा अपयशी ठरल्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचे या हंटरने सांगितले.