काठमांडू : नेपाळच्या भयानक भूकंपाला ५ दिवस उलटूनही आंतरराष्ट्रीय मदत पथकं काठमांडूमध्ये अडकून पडलेत. काल संध्याकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे.
या पावसानं बचावकार्यात अडसर आणलाय. देशाच्या अंतर्गत भागापर्यंत मदतच पोहोचू शकलेली नाही. सरकारी यंत्रणांचं कुठेही अस्तित्व दिसत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना बळावत चालली आहे.
लहान-लहान गावांमध्ये अद्याप घरांचे ढिगारे तसेच आहेत. ते उचलण्यासाठी आणि बचावलेल्यांना सावरण्यासाठी अद्याप कोणीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही.
पायाभूत सुविधा पुर्ववत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. सर्व यंत्रणा काठमांडूवर केंद्रीत झाल्याचं चित्र आहे. दरम्यान, भूकंपातल्या मृतांचा आकडा ६ हजारांच्या आसपास गेला असून ११ हजार जखमी असल्याचं पीटीआयनं म्हटलंय. या भूकंपानं ८० लाख लोकांना फटका बसल्याची संयुक्त राष्ट्रांची आकडेवारी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.