नवी दिल्ली : इराण आणि पश्चिमी देशांमध्ये बऱ्याच काळापासून आण्विक करारावरुन बोलणी सुरु होती. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी जगातील सहा महाशक्तींनी इराणसोबत बोलणी केली आहे.
मागील काही वर्षांपासून इराणसोबत सुरु असणाऱ्या बोलणीचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळं इराणला कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात उघडपणे निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे.
याचा फायदा असा होणार आहे की, कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते या किंमती सध्या असलेल्या किंमतीच्या अर्ध्या होण्याची शक्यता आहे. बऱ्याच वर्षांपासून सुरु असलेल्या बोलणीला स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या बैठकीत यश मिळाले. ज्याचं ३० जूनपर्यंत करारात रुपांतर होऊ शकतं.
इराण आणि पश्चिमी देशांमध्ये होणाऱ्या कराराअंतर्गत इराण त्याच्या परमाणू कार्यक्रम थांबवण्यास तयार आहे. तसंच अमेरिका आणि इतर देशांनी त्याच्यावरिल निर्बंध काढून घेण्याचे मान्य केले आहे. याचा फायदा भारतालाही होणार आहे.
भारत हा इराणकडून सर्वाधिक तेल आयात करणारा देश आहे. भारतानं अमेरिकेच्या दबावात तेहरानमधून तेल आयात करण्यावर बरीच कपात केली होती. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाल्यानं भारतात इंधनाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.