इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. मसूद अजहर आणि त्याच्या भाऊ अब्दूल रहमान रऊफसह १३ दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आलंय.
जैश-ए-मोहम्मदच्या कार्यालयांवर पाकिस्तान पोलिसांनी छापामारी सुरू आहे. अनेक कार्यालयं सील करण्यात आले आहेत. मसूद अजहर हा पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानवर कारवाईसाठी दबाव आणला होता. तसंच परराष्ट्र सचिव स्तरावरील प्रस्तावित चर्चेवरही प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कारवाईसाठी हालचाली केल्याची चर्चा आहे. पाकिस्तान सरकार पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी एक विशेष पथक पाठवणार असल्याचंही समजतंय.