ढाक्का : पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचे ढाक्क्यात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर पंतप्रधान शेख हसिना यांनी मोदी यांचे स्वागत केले. या दौऱ्यात अनेक करार होण्याची शक्यता आहे.
उभय देशांतील संबंध आणि सहकार्य अधिक प्रगाढ करणे, त्याची व्याप्ती आणखी विस्तृत करणे यावर भर दिला जाणार आहे. तसेच ऊर्जा, विद्युत आणि संपर्क आणि जोडणी हे मुद्दे या दौऱ्याच्या केंद्रस्थानी असतील, असे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले.
भारत आणि बांग्लादेशादरम्यान झालेल्या भूमी-सीमा देवाण-घेवणा करारावर दोन्ही देशांच्या संसदेने शिक्कामोर्तब केले आहे आणि हा ऐतिहासिक करार ही या दौऱ्याची महत्त्वपूर्ण बाब आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही या दौऱ्यात सहभागी आहेत. या कराराच्या देवाण-घेवाणीच्या समारंभाला त्याही उपस्थित राहणार आहेत. भारत-बांगलादेशाची सीमा ४०९६ किलोमीटर लांबीची आहे. एवढ्या दीर्घ सीमारेषेची देखरेख अवघड बाब होती. आता प्रमुख भागात कुंपण घालण्यात आलेले आहे; परंतु नव्या करारामुळे सीमा सुरक्षा, अवैध घुसखोरी यास आळा घालणे शक्य होणार आहे.
दोन्ही देशांमध्ये विविध करार होण्याची शक्यता आहे. यामध्ये परस्पर दळणवळण व संपर्क यात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करणे, दोन्ही देशांतील लोकांचा परस्परांशी वाढता संपर्क, सांस्कृतिक देवाण-घेवाणीमध्ये आणखी वाढ करणे, कोलकता-ढाका-आगरतळा बसप्रमाणेच इतर ठिकाणीही बस सुरू करणे, बांग्लादेशाला डिझेल पुरवठा वाढविणे, वीजपुरवठ्यात वाढ करणे या विषयांचा त्यात समावेश असण्याची शक्यता मंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आली.
बांग्लादेश, भूतान, नेपाळ व भारत यांच्यात मोटार वाहनविषयक उपविभागीय करार होणे अपेक्षित आहे आणि लवकरच त्यावर स्वाक्षऱ्या होतील आणि त्याबाबत बांग्लादेशाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.