इस्लामाबाद : मोठ्या पडद्यावर एका अत्यंत क्रूर अशा दहशतवाद्याला प्रतिबंध करायला निघालेल्या एका भारतीय गुप्तहेराची कथा रंगवणाऱ्या 'बेबी' या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय.
अक्षय कुमार फेम 'बेबी' हा सिनेमात पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही. पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डानं या सिनेमाला परवानगी देण्यास नकार दिलाय.
'द डॉन' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद आणि कराचीच्या सेन्सॉर बोर्डानं सिनेमावर बंदी आणण्याचा निर्णय घेतलाय. या सिनेमातून मुस्लिमांची नकारात्मक प्रतिमा रंगवण्यात आलीय तसंच सिनेमातील नकारात्मक भूमिकांची नावंही मुस्लिम आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
सिनेमाच्या सगळ्या सीडी आणि डीव्हीडींवर इस्लामाबादमध्ये बंदी घालण्यात आलीय. सिनेमाचे वितरक 'एर्वेड्डी पिक्चर्स'च्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आलीय.
हा सिनेमा २३ जानेवारी रोजी पाकिस्तानात प्रदर्शित होणार होता. कराचीच्या सिनेघरांनी आपल्या वेबसाईटवरून या सिनेमाचे शो रद्द केलेत.
या सिनेमात पाकिस्तानी टीव्ही कलाकार मिकाल जुल्फीकार आणि रशीद नाज यांनीही भूमिका साकारल्यात. रशीद यानं शोएब मन्सून यांच्या 'खुदा के लिए' या सिनेमात खलनायक धर्मगुरूची भूमिका निभावली होती.
यापूर्वी, 'बेबी' या सिनेमाचा दिग्दर्शक नीरज पांडे यांनी हा सिनेमा 'पाकिस्तान विरोधी' नसल्याचं म्हटलं होतं. बोर्डाच्या नियमांनुसार 'पाकिस्तान विरोधी' विषय दर्शवणाऱ्या सिनेमांवर बंदी घालण्यात येते. यापूर्वी, स्थानिक सेन्सॉर बोर्डानं 'एक था टायगर' या सिनेमावरही बंदी घातली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.