मुंबई : ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’च्या बॅनर... सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शन आणि विशाल शेखरचं संगीत... ही सगळी खिचडी शिजली होती ‘बँग बँग’ या सिनेमासाठी... पण, ही खिचडी थोडी कच्चीच राहिलीय.
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांची अॅक्शन आणि रोमांन्सनं हा सिनेमा पूरेपूर भरलाय. या सिनेमात डॅनी, जावेद जाफरी आणि पवन मल्होत्रा यांनीही आपल्याला मिळालेल्या भूमिकांमधून लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. हा सिनेमा हॉलिवूड सिनेमा ‘नाईट अँन्ड डे’चा रिमेक असल्याच सांगितलं जातंय. सिनेमा पाहून हृतिक ‘धूम-२’ आणि ‘कृष’ सीरिजमधून पुढे निघाल्यासारखा वाटतोय. सिनेमातील हृतिकचे स्टंट आणि अॅक्शन सीन धमाकेदार आहेत.
फॉक्स स्टार स्टुडिओसाठी दिडशे करोड रुपयांची गुंतवणूक... आणि तीही एका सिनेमासाठी... ही खूप साधारण गोष्ट असेल... पण, हिंदी सिनेमात कदाचितच कुणी इतका खर्चिक सिनेमा बनवला असेल. इतका महागडा सिनेमा असल्यानं प्रेक्षकांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या... पण, त्या अपेक्षांवर मात्र हा सिनेमा कमी पडलाय.
सिनेमात जबरदस्त अॅक्शन, सुंदर सुंदर लोकेशन्स आणि बॉलिवूडचे दोन सुंदर चेहरे... प्रेक्षकांना आकर्षित करतात. पण, बाकी सगळा सिनेमा तुम्हाला ‘सहन’ करावा लागतो.
सिनेमाचं कथानक...
एका बँकेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या हरलीनचं (कतरिना कैफ) आयुष्य खूप बोअरिंगरित्या सुरू आहे. आयुष्यात एक रोमांच उभा करण्यासाठी ‘ट्रू लव्ह डॉट कॉम’द्वारे विक्की नावाच्या एक ब्लाइंड डेट फिक्स केली जाते. राजवीरलाच (हृतिक रोशन) ती विक्की समजते. या दोघांची गोष्ट काही पुढे सरकणार त्याआधीच राजवीरची काही लोकांसोबत झटापट आणि गोळीबार सुरू होतो. परिस्थिती काही अशी असते की हरलीनला अशा परिस्थितीत राजवीरसोबतच राहावं लागतं.
राजवीरनं कोहिनूर हिरा चोरलेला आहे... जो मिळवण्यासाठी पोलीस आणि एक गँग त्याच्या मागे लागलीय.
सिनेमाचं लेखन...
सिनेमाची स्क्रिप्ट सुभाष नायर आणि सुजॉय घोष यांनी लिहिलीय. या सिनेमाला हरलीनच्या नजरेतून दाखवण्यात आलंय. हरलीनच्या डोक्यात राजवीरसंबंधी अनेक प्रश्न आहेत... जे प्रेक्षकांच्या मनातही घोळत राहतात. तो कोण आहे? त्याला नेमकं हवंय काय? त्याच्या मागे पोलीस आणि काही गुंड का पडलेत? त्याची पुढची योजना काय? कोहिनूर त्यानं का चोरलाय? याची उत्तरं बऱ्याच वेळेपर्यंत मिळतंच नाहीत... आणि मग कंटाळा येतो की इतका सिनेमा का ताणला गेला असावा? आणि मग हळू हळू प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात. पण, ते प्रेक्षकांना एव्हाना ते कळलेलेही असतात.
टाळण्यासारख्या गोष्टी...
संपूर्ण सिनेमा एखाद्या क्लायमॅक्ससारखा वाटतो... राजवीर-हरलीन या देशातून त्या देशात पळत राहतात... या भागदौडीत अॅक्शन, रोमांस आणि कॉमेडी आहे. हा मजेदार प्रवास बऱ्याचदा बोअरिंग आहे. सिनेमातील अॅक्शन सीन ढासू आहेत... रोमान्स ठीकठाक वाटतो पण या सिनेमातील ड्रामा मात्र फोल ठरलाय.
सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलंय. सिद्धार्थ अजूनपर्यंत एकही सुपरहीट सिनेमा दिलेला नाही आणि अशात या व्यक्तीवर दीडशे करोड रुपये लावणं, अनेकांना आश्चर्यकारक वाटतंय. सिद्धार्थसमोर ‘नाईट अँन्ड डे’ होता... त्यामुळे त्याचं काम सोप झालं होतं. त्यामुळे त्यानं प्रस्तुती करताना सिनेमा इंग्रजी स्टाईलचा वाटेल याची काळजी घेतलीय पण, यामध्ये बॉलिवूडची मसाला भरण्यापासून तो स्वत:ला रोखू शकला नाही. त्याचा खलनायक टिपिकल आहे.
काय पाहण्यासारखं...
सिनेमातील प्लस पॉईंट आहे हवाई सफर, स्टीमर वेगवेगळ्या कार यांद्वारे निर्माण केलेलं वातावरण... सिनेमातील अॅक्शन सीन चांगले झालेत. कतरिना आणि हृतिकची जोडीही प्रेक्षकांना चांगलीच भावलेली दिसतेय. हृतिकला खुपच कमी कपडे घालायला मिळालेत त्यामुळे त्याला बॉडी प्रदर्शनाच्या अनेक संधी मिळाल्यात. हृतिकच्या भूमिकेतली स्टाईल आणि अॅटीट्यूडही प्रेक्षकांना भावलाय.
सिनेमातील गाणी…
सिनेमात दोन-तीनच गाणी आहेत... ‘तू मेरी’मधला हृतिकचा डान्स पाहण्यासारखा आहे. बॅकग्राऊंड म्युझिक सिनेमाला भव्य बनवतो. फोटोग्राफी, लोकेशन्स आणि तांत्रिकदृष्ट्या सिनेमा चांगला झालाय. ज्यांना अॅक्शन सिनेमांची आवड असेल ते हा सिनेमा नक्कीच पाहू शकतील पण ज्यांना सिनेमाच्या कथेत आणि धाटणीत थोडी जाण असावी, अशी अपेक्षा असेल त्यांचा मात्र हा सिनेमा अपेक्षाभंग करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.