बॉबी जासूस : विद्याचे 12 रंग!

द डर्टी पिक्चर, कहानी आणि परिणीता यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला सिद्ध करणाऱ्या विद्या बालन ही पुन्हा एकदा ‘बॉबी जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय.  

Updated: Jul 4, 2014, 03:48 PM IST
बॉबी जासूस : विद्याचे 12 रंग! title=

सिनेमा : बॉबी जासूस
दिग्दर्शक : समर शेख
निर्माते : दिया मिर्झा, साहिल सांघा, रिलायन्स एन्टरटेन्मेंट
संगीत : शंतनू मोईत्रा
कलाकार : विद्या बालन, अली फझल

 

मुंबई : द डर्टी पिक्चर, कहानी आणि परिणीता यांसारख्या सिनेमांमधून आपल्याला सिद्ध करणाऱ्या विद्या बालन ही पुन्हा एकदा ‘बॉबी जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आलीय. या सिनेमात विद्या तब्बल 12 वेगवेगळ्या रुपांत दिसतेय.

काही हीट सिनेमे दिल्यानंतर विद्याचा करिअर ग्राफ खाली सरकताना दिसत होता. विद्याच्या ‘घनचक्कर’ आणि ‘शादी के साईड इफेक्टस’ या सिनेमांकडे प्रेक्षकांनी साफ पाठ फिरवली... त्यानंतर आज समर शेख दिग्दर्शित बॉबी जासूस हा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल झालाय. या सिनेमाची संपूर्ण कथा विद्याभोवतीच गुंडाळलेली आहे. यावेळी, विद्यानं आपल्या इमेजपेक्षा थोड्या हटके भूमिका ‘बॉबी जासूस’मध्ये निभावल्यात.

काय आहे सिनेमाचं कथानक

विद्यानं या सिनेमात बीकीज अहमद ऊर्फ बॉबीची भूमिका निभावलीय. बॉबीचा लहानपासूनचा छंद म्हणजे लोकांवर पाळत ठेऊन जासूसगिरी करणं... पण, तिच्या ‘अब्बां’ना मात्र तिची ही जासूसगिरी पसंद नाही. बॉबीच्या ‘अम्मी’ला मात्र विद्या जासूस बनली तरी काही हरकत नाही. पण, तिच्या अब्बांची मात्र इच्छा आहे की, बॉबीनं पहिल्यांदा लग्नाच्या बेडीत अडकून आपला घरसंसार सांभाळावा.

सिनेमाचं कथानक पुढे सरकताना काही अशी परिस्थिती निर्माण करतं जिथे बॉबीला आपली डिटेक्टिव्ह एजन्सी सुरु करण्याचा चान्स मिळतो. मग, बॉबीला वेगवेगळ्या केसेसही मिळायला सुरूवात होते. त्यामुळे अनेक कठिण प्रसंगही बॉबीसमोर येतात. मग, वेगवेगळ्या घटनांमधून प्रेक्षकांना आश्चर्यचकित व्हायची संधीही मिळते.  

‘विद्या बालन’चा सिनेमा

या सिनेमात विद्या बालन तब्बल 12 रुपांत दिसतेय. ‘बॉबी जासूस’नं घेतलेली ही 12 रुपं विद्यानं अगदी लाजवाब वठवलीत. विद्याच्या अभिनय क्षमतेचा कसही यामध्ये दिसून येतो. विद्याच्या मानानं अलीला फारसा वावच मिळालेला नाही. राजेंद्र गुप्ता, तन्वी आजमी आणि सुप्रिया पाठक यांच्यासहीत सगळेच कलाकार आपल्या भूमिकांत चांगले वाटतात.

कुठे कमी पडला सिनेमा

सिनेमाचा सगळ्यात पडीक भाग म्हणजे या सिनेमाची गती... स्क्रिप्ट उत्तम असली तरी स्क्रिप्ट आणि सिनेमाची गती याचा ताळमेळ कमी पडताना दिसतो. त्यामुळे बऱ्याचदा सिनेमा भटकताना दिसतो. संगिताच्या बाबतीत म्हणाल तर शांतनु मोइत्रा आणि स्वानंद किरकिरे फारसे लक्षात राहतील, अशी गाणी बनवू शकण्यात थोडे कमी पडलेत. थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर लक्षात राहतील किंवा ती गाणी तुम्ही गुणगुणत बाहेर पडाल, ही शक्यता कमीच. प्रेक्षकांना बांधून ठेवण्यासारखं दिग्दर्शन देण्यात समर शेखही कमी पडलाय.

शेवटी काय तर...

तुम्ही विद्याचे फॅन असाल किंवा विद्याचा अभिनय पाहायचा असेल तर हा सिनेमा जरुर पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.