विटी दांडू : एक खेळच नाही तर आजोबा-नातवाची प्रेमळ कहाणी

पूर्वी गल्लीबोळात दिसणारा विटीदांडूचा खेळ हा आजच्या मुलांसाठी एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. हा मराठमोळा खेळ कालबाह्य होत असतानाच बॉलिवूड स्टार अजय देवगणने मात्र याच खेळाला पसंती देत आपली पहिली मराठी सिनेनिर्मिती केलीय. अजयने मोठ्या पडद्यावर विटीदांडूचा खेळ रंगवलाय....

Updated: Nov 21, 2014, 09:07 PM IST
विटी दांडू : एक खेळच नाही तर आजोबा-नातवाची प्रेमळ कहाणी title=

 

सिनेमा : विटीदांडू
निर्माता : अजय देवगण
दिग्दर्शन : गणेश कदम, विकास कदम 
संगीत : संतोष मुळेकर
कलाकार : दिलीप प्रभावळकर, रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, विकास कदम, मृणाल ठाकूर, बालकलाकार शुभंकर अत्रे, निशांत भावसार 

पूर्वी गल्लीबोळात दिसणारा विटीदांडूचा खेळ हा आजच्या मुलांसाठी एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. हा मराठमोळा खेळ कालबाह्य होत असतानाच बॉलिवूड स्टार अजय देवगणने मात्र याच खेळाला पसंती देत आपली पहिली मराठी सिनेनिर्मिती केलीय. अजयने मोठ्या पडद्यावर विटीदांडूचा खेळ रंगवलाय....

खो-खो, कबड्डी, आट्यापाट्या याबरोबरच विटी दांडू हाही खेळ गावागावात तितकाच लोकप्रिय होता. विटीदांडूचा हा खेळ फिल्मी पडद्यावर आणलाय दिग्दर्शक गणेश कदम यांनी... दिलीप प्रभावळकर यांच्यासह रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, विकास कदम, मृणाल ठाकूर आणि बालकलाकार शुभंकर अत्रे, निशांत भावसार या कलाकारांनी हा विटीदांडूचा खेळ पडद्यावर रंगवलाय. सध्या व्हीडिओ गेम्स आणि कार्टूनच्या विश्वात हरवून जाणारी मुलं मैदानी देशी खेळांपासून कशी वंचित रहातात याचं चित्र यात मांडण्यात आलंय. मात्र फक्त विटीदांडूचा खेळ एवढाच या सिनेमाचा विषय मर्यादित नाहीय हे विशेष... एकूणच दिलीप प्रभावळकर आणि बालकलाकार निशांत भावसार यांच्या अभिनयाने रंगलेला हा विटीदांडूचा खेळ प्रेक्षकांनाही शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. 

कथा
अजय देवगणच्या फिल्म कंपनीने मराठीत ज्या सिनेमाद्वारे पहिलं पाऊल ठेवलंय, तो सिनेमा म्हणजे 'विटीदांडू'... 'विटीदांडू'ची कथा ही सिनेमाच्या नावावरूनच काहीशी लक्षात येते. मात्र, फक्त खेळावरच आधारित हा सिनेमा नाहीय तर ही कथा आहे आजोबा-नातवाच्या प्रेमळ नात्याची... ही कथा आहे इंग्रजांच्या अत्याचाराला जिद्दीने लढा देणाऱ्या, मोरगावच्या ग्रामस्थांची...  विटीदांडूचा खेळ खेळत असताना नातवाने भिरकावलेली विटी, एका इंग्रज अधिका-याच्या वर्मी लागते, आणि त्याला प्राण गमवावा लागतो. मात्र याच घटनेनंतर सुरूवात होते एका थरारक कहाणीची. 
 
अभिनय
अभिनेता दिलीप प्रभावळकर, शुभंकर अत्रे, निशांत भावसार, विकास कदम, यतीन कार्येकर, मृणाल ठाकूर, अशोक समर्थ अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. आजोबांच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकरांनी नेहमीप्रमाणेच आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. मात्र, त्याबरोबरच निशांत भावसार या बाल कलाकाराने या सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत. विशेष लक्ष वेधून घेतलंय. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि डायलॉग डिलिव्हरी लाजवाबच म्हणावी लागेल. बाकी रवींद्र मंकणी, यतीन कार्येकर, विकास कदम, यांच्या वाट्याला तशा छोट्याशाच भूमिका आहेत. मध्यांतरानंतर हा सिनेमा पूर्णपणे आजोबा आणि नातवावरच केंद्रीत झालाय.  
 
संगीत
संतोष मुळेकर यांनी या सिनेमाला संगीत दिलय. स्वातंत्र्यलढ्यावर आधारित सिनेमा असल्याने त्या स्टाईलची गाणी सिनेमात आहेतच. मात्र त्याहीपेक्षा सिनेमाची सिनेमॅटोग्राफी सर्वाधिक प्रभावी ठरलीये. शैलेश अवस्थीचं अप्रतीम कॅमेरा वर्कमुळे हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवत, त्याच वेगाने पुढे-पुढे घेऊन जातो....
 
दिग्दर्शन
गणेश कदम हे या सिनेमाचे दिग्दर्शक. तर विटीदांडूची ही कथा पडद्यावर आणलीये विकास कदम याने. ज्याला आपण सगळे शिऱ्या म्हणून ओळखतो. सिनेमाचा क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून विकास कदमने कोकणातली लोकेशन्स असोत किंवा कथेची मांडणी यावर भरपूर मेहनत केलेली दिसतीय. तर हाच इम्पॅक्ट प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात डिरेक्टर गणेश कदम यशस्वी ठरलाय खरा, मात्र सिनेमातली गाणी आणखीन क्रिएटीव्ह असती तर कदाचित हा सिनेमा आणखी प्रभावी ठरला असता. 

शेवटी काय तर... 
लोकेशन्सच्या प्रेमात पडत अनेकदा त्याच त्याच फ्रेम्स दाखवण्याचा मोह झाल्याने आणि संगीताकडे म्हणावं तितकं लक्ष न दिल्याने सिनेमा प्रेक्षकांसाठी थोडासा कंटाळवाणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे स्वतः अजय देवगणने सिनेमाच्या प्रमोशनसाठी पुढाकार घेऊनही काही कलाकारांनी प्रमोशनसाठी दाखवलेला अनुत्साह... त्यामुळे सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात किती यशस्वी ठरेल हे सांगणंही तसं कठीणच आहे... बाकी कोकणातला निसर्ग,  मनाला साद घालणारी हटके डेस्टिनेशन्स आणि क्रांतिकारकांचा थरारक इतिहास असं एकत्रित पॅकेज या विटीदांडूच्या खेळात तुम्हाला पहायला मिळतं.... 

आम्ही या सिनेमाला देतोय अडीच स्टार्स.... 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.