मुंबई : उरी हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जावू देऊ नका अशी मागणी सर्वत्र होत आहे. सरकार देखील पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यापासून तर हा वाद आता पाकिस्तानी कलाकारांना देशातून निघून जाण्यास सांगण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.
मनसेने पाकिस्तानच्या कलाकारांना भारतातून निघून जाण्यास सांगितलं आहे तसं न केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा देखील इशारा देण्यात आला आहे. फवाद खान, माहिरा खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर आता सलमान खानने या वादामध्ये उडी घेतली आहे.
मनसेने करण जोहरला इशारा दिला आहे की त्याचा ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित नाही होऊ देणार कारण त्यामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान याचा अभिनय आहे. मनसे कार्यकर्ते करण जोहरच्या कार्यालयात त्याला निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर करण जोहरच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मनसेने निवेदन दिलं आहे की, या सिनेमातून पाकिस्तानी कलाकार फवाद खानचा रोल काढून टाकावा.
करण जोहरच्या मदतीसाठी आता सलमान खान धावून आला आहे. सलमान आणि राज ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहे. सलमान खानने राज ठाकरे यांना फोन करुन या वादावर तोडगा काढण्यास सांगितलं असल्याचं बोललं जातंय.