नवी दिल्ली : सलमान खानबाबत सोशल मिडियावर सुरू असलेल्या चर्चेत बोलणं श्रीमोयी पीयू कुंडू या लेखिकेला महागात पडलंय. सलमानच्या फॅन्सकडून त्यांना सोशल मिडियावर शिवीगाळ करण्यात आली इतकंच नव्हे तर सलमानच्या शिक्षेविरूद्ध अभियान चालवणाऱ्या सलमानच्या काही उत्साही फॅन्सनी त्यांचं फेसबुक अकाऊंदही बंद पाडलं.
सोमवारी 'फेसबूक'वर पुन्हा दाखल झाल्यावर 'मी फेसबूकवर परतलेय. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा विजय आहे का? महिलांना वेश्या म्हणून हिणवणं आणि बलात्काराची धमकी देणं, कधी बंद होणार?' अशी आगपाखड श्रीमोयी यांनी केलीय.
सलमान खानच्या फॅन्सनं श्रीमोयीसाठी सोशल वेबसाईटवर केलेल्या सर्व शिव्यांचा उल्लेखही तिनं आपल्या या पोस्टमध्ये केलाय. यानंतर, श्रीमोयीचं फेसबुक अकाऊंट काही काळासाठी बंद झालं होतं. पण, मित्रांच्या साहाय्याने श्रीमोयी यांनी आपलं फेसबुक अकाऊंट पुन्हा सुरू केलं.
लेखिक आणि स्त्री असल्याने मी नेहमी न घाबरता माझं मत मांडते... मात्र, यावेळी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अश्लील शाब्दिक हल्ले करण्यात आले. त्यानंतर मी फक्त कमेंट करणाऱ्यांना बॅन केलं आणि कमेंट डिलिट केल्या, असंही श्रीमोयीनं म्हटलंय.
गेल्या शुक्रवारी श्रीमोयी यांनी सलमान खानच्या शिक्षेसंबंधीत आपलं मत 'फेसबुक' या सोशल वेबसाईटद्वारे मांडलं होतं. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. बॉलिवूड स्टार सलमानविरुद्ध आपलं मत मांडल्यामुळेच आपल्याला हे सर्व सहन करावं लागतंय, असं श्रीमोयीनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.