नाशिक : येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.
येवला मतदारसंघातलं बाभूळगाव. याच घरात जानुबाई वाबळे नावाची महिला राहते. मतदानाच्या दिवशी जानुबाईला मतदानयंत्रातलं तीन नंबरचं बटन दाबण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र तिनं दोन नंबरचं बटन दाबलं. हे लक्षात आल्यानंतर अशोक बोरनारे, पांडुरंग बोरनारे आणि नंदकिशोर भूरक हे तिघेजण गुरूवारी रात्री जानुबाईच्या घरात घुसले आणि त्यांनी तिला जाब विचारला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चक्क रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं. तिघांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं नाही, म्हणून मला जाळल्याचा आरोप तिनं पोलिसांना आपल्या जबाबात दिला. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटकही केली.
जानुबाई 65 टक्के भाजली असून, सध्या नाशिक जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र रूग्णालयात काय सूत्रं फिरली, माहित नाही. जानुबाईनं आपली आधीची जबानी फिरवली. पदर स्टोव्हवर पडल्यानं मी स्वतःच अपघातात जळाली, असं तिनं सांगितलं. तिच्या भावानंही हा अपघात असल्याचं स्पष्ट केलंय.
निवडणुकांमध्ये लक्ष्मीदर्शनाचा खेळ कसा चालतो आणि हा खेळ जीवावरही कसा बेतू शकतो, हेच येवल्याच्या या घटनेवरून स्पष्ट होतं. या घटनेमागचा खरा प्रकार शोधून काढण्याचं आव्हान आता पोलिसांपुढं आहे. राजकीय दबावामुळं जानुबाईनं आधीची जबानी फिरवली का, याचाही शोध त्यांना घ्यावा लागणार आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमागच्या खऱ्या सूत्रधारांचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.