भाजपचा अब्जाधीश उमेदवार

निवडणूक आयोगाने उमेदवारांना संपत्तीचं विवरण देणे, अनिवार्य केल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीचे दाखले बाहेर येत आहेत.

Updated: Sep 30, 2014, 04:58 PM IST
भाजपचा अब्जाधीश उमेदवार title=

मुंबई : निवडणूक आयोगाने उमेदवारांना संपत्तीचं विवरण देणे, अनिवार्य केल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीचे दाखले बाहेर येत आहेत.

या मतदारसंघातील सर्वच उमेदवार कोट्यधीश असले, तरी दिंडोशी मतदारसंघातून भाजपचे मोहित कंबोज हे अब्जाधीश उमेदवार आहेत. त्यांच्याकडे एकूण 3 अब्ज 10 कोटींपेक्षाही जास्त किमतीची संपत्ती आहे.

मोहित कंबोज हे मुंबई भाजप उपाध्यक्ष आहेत. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष व माजी नगरसेवक अजित रावराणे आणि काँग्रेसच्या वतीने दिंडोशीचे आमदार राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

मुंबईत एक मोठे व्यावसायिक प्रस्थ म्हणून मोहित कंबोज हे अगदी काही महिन्यांपूर्वी समोर आले. खारला राहणारे कंबोज या तरुण उमेदवाराला दिंडोशीत उमेदवारी भाजपने दिली आहे. 

एफ. वाय. बी. कॉमपर्यंत ते शिकले आहेत. त्यांच्याकडील संपत्ती मात्र डोळे विस्फारायला लावणारी असून, त्यांच्यावर बेकायदा बांधकामे, कर्मचाऱ्याला मारहाण आदी गुन्हे दाखल असून न्यायालयात खटलेही सुरू आहेत. 

मोहित यांच्या नावावर रोख आणि बॅंकेत तसेच विविध ठेवी योजना मिळून एकूण 2 अब्ज 10 कोटी 77 लाख रुपये, तर पत्नी आकशा यांच्या नावावर 7 कोटी 45 लाख 8 हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

निवासी घर आणि अन्य स्थावर मालमत्ता असे एकूण एक अब्ज 35 कोटी 31 लाख किमतीची सध्या बाजारभाव असलेली मालमत्ता आहे. मोहित यांच्यावर 3 अब्ज 10 कोटी 66 लाख 6 हजार, तर पत्नीवर 5 कोटी 77 लाख 93 हजारांची कर्जे दर्शवण्यात आली आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.