मुंबई : सध्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे... भाजपच्या वरच्या फळीतील नेतृत्वांपैकी एक... भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांपैकी एक... काही जण त्यांना गृहमंत्रीपदी बसलेलं पाहत आहेत...
विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते विनोद तावडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यानं ही लढत त्यांच्यासाठी सोपी असली तरी विरोधकांकडून मात्र मतदारसंघाबाहेरचा उमेदवार म्हणून मुद्दा उपस्थित केला जातोय. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांची चांगली पकड असलेल्या या मतदारसंघातून आता भाजप नेते विनोद तावडे आपले नशिब आजमावतायेत. शिवसेनेनं याठिकाणी कुणालाही परिचित नसलेल्या उत्तम अग्रवाल या अमराठी व्यक्तीला उमेदवारी दिलीय... काँग्रेसनं अशोक सुतराळे यांना मैदानात उतरवलं आहे तर मनसेनं नयन कदम यांना उमेदवारी दिलीय. हे दोघेही स्थानिक उमेदवार आहेत. त्यामुळं भाजप उमेदवार विनोद तावडे मतदारसंघाबाहेरचं असल्याचा मुद्दा ते उपस्थित करतायत.
मुंबईच्या गिरगावात २० जुलै १९६३ मध्ये एका मराठा कुंटुंबात विनोद तावडेंचा जन्म झाला. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलंय.
शिक्षणादरम्यानच त्यांनी 'अखिलभारतीय विद्यार्थी परिषदे'चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली. ज्या काळात ब्राह्मणांची संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविपला हिणवले जायचे, त्या काळात म्हणजे २५ वर्षांपूर्वी अभाविपचे नेतृत्व चंद्रकांत पाटील, विनोद तावडे अशी मंडळी करीत होती. ‘अभाविप’चे महानगर संघटकमंत्री म्हणून विनोद पूर्ण वेळ काम करत होते. त्या काळात मंत्रालयासमोर त्यांनी केलेले ठिय्या आंदोलनही बरच गाजलं होतं.
विद्यार्थी परिषदेचीच कार्यकर्ती वर्षा पवार यांच्याशी विनोद तावडे यांचं लग्न झालंय. वर्षा आणि विनोद या दोघांचाही खूप चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे. दोघेही विधिमंडळासाठी माहिती संशोधन करणाऱ्या स्पार्क नावाच्या संस्थेचे काम करतात.
दोन वर्षे ते दिल्लीतही संघटनमंत्री होते. त्यांनी काम थांबवले तेव्हा प्रथेप्रमाणे त्यांचा निरोप समारंभ झाला. त्यावेळी विविध क्षेत्रांतली शेकडो मंडळी हजर होती. कारण, विनोद यांचा जनसंपर्क मोठा होता. तरुण कार्यकर्ता असलेला विनोद ‘डॅशिंग’ म्हणून ओळखला जायचा.
साहित्य संमेलनातल्या त्यांच्या भाषणाला मनोहर जोशींनी दाद दिली, तर प्रत्येक जिल्ह्यात एक गाळा पुस्तक विक्रेत्याला द्यावा ही मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उचलून धरली. दिल्लीतून आल्यावर त्यांनी परिषदेतल्या मित्रांबरोबर व्यवसाय सुरू केला. अचानक एक दिवस ते भाजपचे काम करू लागले. त्यांच्या अगोदरपासून भाजपची काम करणारी मंडळी अर्थातच होती. पण विनोद तावडे भाजपचं नवं नेतृत्व म्हणून पुढे आलं याला कारण त्यांची माणसे जमवण्याची सचोटी आणि डॅशिंगपणा सोबतच कुठल्याही प्रश्नाचा अभ्यास करण्याची वृत्ती...
विनोद तावडे १९९५ ते १९९९ आणि २००२ ते २०११ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस होते. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी १९९९ मध्ये मुंबई महानगर प्रदेशचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलीय. २०१२ पासून ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहतायत. विनोदजींचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं... त्यामुळे कोकणचा विकास हाही त्यांच्या अजेंड्यावरचा एक विषय...
ठरवली की ती गोष्ट ते करतातच, अशी त्यांची आणखी एक उल्लेखनीय गोष्ट... मग ते वजन कमी करणे असो की बंगलोरला एसएसवाय (सिद्ध समाधी योग) कोर्स करणे असो, की ‘हिंदू’ सारखी कादंबरी वाचणे असो... राज ठाकरे, राजन शिरोडकर, मोहन रावले अशा भारतीय विद्यार्थी सेनेचे काम करणाऱ्यांबरोबरही त्यांची मैत्री... चुटके आणि विनोद हसत खेळत शेअर करणं ही त्यांची आणखी एक खासीयत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.