यवतमाळ : पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.
महाराष्ट्र राज्याचं सलग सलग ११ वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविणारे वसंतराव नाईक यांचा हा मतदारसंघ. नाईक घराण्याचेच सुधाकरराव नाईक यांनीही दोन वर्ष मुख्यमंत्रीपद भुषवलं. त्यामुळे नाईक घराण्यातील दोन जणांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देणारा हा पुसद विधानसभा मतदारसंघ आजही नाईक घराण्याच्याच अधिपत्याखाली आहे. सध्या नाईक घराण्यातून सत्ताकारणाची धुरा राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मनोहर नाईक सांभाळत आहेत.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मनोहर नाईक यांना ७७,१३६ मते मिळाली. तर त्यांच्याविरोधात असलेल्या शिवसेनेच्या डॉ आरती फुफाटे यांना ४६,२९६ मतं मिळाली. या निवडणुकीत मनोहर नाईक यांचा ३०८४० मताधिक्याने विजय झाला.
आमदारांची कामे…
आदिवासी प्रकल्प कार्यालयाची उभारणी , पाणी पुरवठा योजना , मुख्य रस्त्यांची कामे , युवकांना रोजगार, अशी विविध विकासकामे केल्याचा दावा मनोहर नाईक यांनी केलाय.
मतदारसंघात कडवा प्रतिस्पर्धी नसल्याने मनोहर नाईक यांना याआधीची निवडणूक सोपी गेल्याचं सांगण्यात येतंय. आता मात्र त्यांच्यापुढे दोन प्रतिस्पर्धी आव्हान निर्माण करण्यासाठी सज्ज झालेत.
राष्ट्रवादीच नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून नाइकांविरुद्ध दंड थोपटलेत. तर धनगर समाजाचे नेते महेश नाईक देखील शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छित होते. मात्र, शिवसेनेने प्रकाश देवसरकर यांना उमेदवारी दिली आहे.
पुसदमधील समस्या...
१३ वर्ष मुख्यमंत्री पद आणि त्यानंतर सातत्याने मंत्रिपद मिळालेल्या पुसद विधानसभा मतदारसंघात विकासाची मात्र बोंब आहे. तांडा वस्त्यांची दुरवस्था आहे. माळ पठार आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. जल सिंचनाचा इसापूर प्रकल्प, मात्र फायदा मराठवाड्याला झालाय., शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. सूतगिरण्या बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे एकूणच नागरिकांची नाराजी आहे.
नाईक घराण्याला दैवतासमान मानणारा बंजारा समाज या मतदारसंघात सर्वाधिक आहे. महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला ही जागा असली तरी गेल्या दोन निवडणुकीत मनोहर नाईकांना लढत देणारया डॉ. आरती फुफाटे देखील आता शिवसेना सोडून नाईकांच्या तंबूत यॆवुन जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट दिसली तरी पुसद मध्ये मात्र कॉंग्रेस उमेदवाराला २१२४१ मतांची आघाडी मिळाली. एकूणच बदलती राजकिय गणितं पाहता यावेळी राजकीय रंगत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निवडणुकीत नाईक घराण्यातून मनोहर नाईकांचे पुत्र व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ययाति नाईक यांना उमेदवारी मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे एकूणच पुसदची जनता यंदा कुणाला कौल देते याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.