मुंबई : मागठाणे मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळतेय. मनसेच्या प्रवीण दरेकरांसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल. त्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसनं जोरदार तयारी केलीय. तिन्ही पक्षांनी मराठी उमेदवार दिले असले तरी उत्तर भारतीय मतदारांची भूमिकाही इथं महत्वाची ठरणार आहे.
२००९च्या विधानसभा निवडणुकीत मागठाणे विधानसभा मतदारसंघ मनसेनं आपल्या ताब्यात ठेवला होता. परंतु मनसेचे विद्यमान आमदार प्रवीण दरेकरांसाठी ही निवडणूक काहीशी अवघड मानली जातेय. गेल्या ५ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राज ठाकरेंची हवा यावेळी तितकीशी जाणवत नाहीय. तसंच मुंबई जिल्हा बँकेतील घोटाळ्याचा मुद्दाही विरोधकांनी त्यांच्याविरोधात उपस्थित केलाय. मात्र कामाच्या जोरावर निवडून येण्याचा विश्वास प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलाय.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत येवून उमेदवारी मिळवलेल्या प्रकाश सुर्वेंनी दरेकरांसमोर आव्हान उभं केलंय. मागठाणेमध्ये मराठीपाठोपाठ उत्तर भारतीय मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी आपल्यासाठी विजयाचं गणित सोपं असल्याचा दावा केलाय. भाजपचे हेमेंद्र मेहता आणि राष्ट्रवादीचे सचिन शिंदेही रिंगणात असले तरी खरी लढत मनसे, सेना काँग्रेसमध्येच असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.