www.24taas.com, बेळगाव
बेळगावजवळच्या संकेश्वर इथल्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात ११ मृत अर्भकं आढळली आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. हा स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय तर जिल्हा अरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी हे मृतदेह आणण्यात आले असावेत, अशी शक्यता वर्तवलीय.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत अर्भकं सापडण्याची ही पहिलीची वेळ असून संकेश्वर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केलाय.
ही सगळी अर्भकं अवघ्या ५ ते ६ महिन्यांची असावीत, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. पुढील तपासणीसाठी ती सरकारी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहेत. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरजवळील उड्डाणपुलाच्या खाली नदीपात्रात ही अर्भके आढळली. ती शुक्रवारी रात्री नदीपात्रात टाकण्यात आली असावीत ,असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यासंबंधी माहिती समजताच जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीपकुमार मन्नोळी यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह नदी पात्रात जाऊन मृत अर्भकांची पाहणी करून पंचनामा केला. रविवारी सकाळी तेथे गेलेल्या एका व्यक्तीने मृत अर्भके पाहून त्या विषयी पोलिसांनी माहिती दिली होती.
घटनास्थळाचे विदारक दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. या घटनेमागील सत्य उजेडात आणणे सरकारी यंत्रणेसाठी आव्हान ठरणार आहे. सरकारी प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच अर्भकांचे लिंगनिदान होऊन भ्रूणहत्या आहे किंवा नाही हे स्पष्ट होऊ शकेल , अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप मन्नोळी यांनी दिली.