डोंबिवली: डोंबिवलीत एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना घडलीय. अवघ्या पाच दिवसांच्या कोवळ्या मुलीला हॉस्पिटलच्या दुस-या मजल्यावरून खाली फेकून ठार मारण्यात आलं. आता मुलगी झाली म्हणून तिला कुणी ठार केलं, की यामागे अन्य काही घातपात आहे, याचा शोध पोलीस घेतायत...
अंबरनाथला राहणाऱ्या सुजाता गायकवाड यांच्यावर आभाळच कोसळलंय... त्यांच्या काळजाचा तुकडाच काळानं हिरावून नेलाय... डोंबिवलीच्या शुभदा हॉस्पिटलमध्ये गेल्या शनिवारी त्या बाळंत झाल्या. एका गोंडस मुलीला त्यांनी जन्म दिला. मात्र त्यांचा आई होण्याचा आनंद फार काळ टिकला नाही... गुरूवारी सकाळी सुजात आपल्या मुलीला पाळण्यात झोपवून रुमबाहेर गेल्या. त्या परतल्या, तेव्हा पाळण्यात बाळ नव्हतं... त्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा अन्य एका रूग्णाच्या नातेवाईकाला हे बाळ शुभदा हॉस्पिटलच्या खाली मृतावस्थेत पडलेलं आढळलं. कुणा पाषाणहृदयी व्यक्ती या कोवळ्या जीवाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून ठार केलं होतं. या प्रकारामुळं सुजाता गायकवाड यांना जबर मानसिक धक्का बसलाय.
याप्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगी झाली म्हणून घरातल्याच कुणा व्यक्तीनं हे भयानक कृत्य तर केलं नसेल ना, यादृष्टीनंही पोलीस तपास करतायत...
हॉस्पिटलमधून लहानगी अर्भकं चोरीला जाण्याच्या घटना वाढल्यात. या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन पोलीस यंत्रणेनं सर्व रुग्णालयांना केलंय. मात्र रूग्णालयांच्या निष्काळजीपणामुळं लहानग्यांचे जीव असे धोक्यात आलेत... शुभदा हॉस्पिटलमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा असती तर कदाचित सुजाताचं बाळ वाचलं असतं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.