सोलापूर : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्याने काही वेळा चर्चेत तर काही वेळा अडचणीत आलेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा असं काही बोलून गेले की थोड्यावेळाने त्यांना लक्षात आले की काही तरी चुकलं आहे. मग काय त्यांनी मस्करीच्या मूडमध्ये प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अकलूजमध्ये आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत असताना बोलण्याचा ओघात म्हटले, की
शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होऊनही बारामतीमध्ये आरटीओचं कार्यालय आले नाही. पण मी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते सुरू झालं. पण लगेच त्यांना आपण काही तरी चुकीचं आणि वादग्रस्त बोलल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी चूक दुरूस्त केली. आणि पत्रकारांकडे पाहून म्हटले उद्या लगेच ‘शरद पवारांवर अजित पवार घसरले’ अशी हेडलाईन करू नका. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला व्यवस्थित बोलायचं ठरवतो, पण असं काही तरी होतं, असा आणखी हशा पिकविणारं विधान केलं.
मात्र यानंतर अजित पवारांनी सारवासारव करताना पवार साहेबांना देशाचा आणि राज्याचा व्याप मोठा असल्याने त्यांना या बारीक गोष्टीत लक्ष द्यायला वेळ झाला नसेल, असे सांगत आपली चूक सुधारली.