अमरावती : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील शंकर महाराजांच्या आश्रमांतर्गत संचालित वसतिगृहात नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीय.
श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरात शिकणा-या आणि वसतीगृहातच राहणा-या अकरा वर्षांच्या अल्पवयीन प्रथमेश सगणे याच्या गळ्यावर ब्लेडनं वार करण्यात आले आहेत. या आश्रमातल्या शाळेतील दोन कंत्राटी कर्मचा-यांसह एकानं प्रथमेशच्या हत्येचा प्रयत्न केला.
नरबळीतून प्रथमेशच्या हत्येचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एकाला ताब्यात घेतले आहे. सुरेंद्र रमेशराव मराठे आणि नीलेश जानरावजी उके ही अटेकत असलेल्या दोघांची नावं आले.
सुरेंद्र मराठे हा मागील काही महिन्यांपासून श्री संत शंकर महाराज वसतिगृहात कंत्राटी पध्दतीने स्वयंपाकी म्हणून काम करतो आहे. त्याने काही वर्षांपूर्वी काळ्या विद्येसंदर्भात एक पुस्तक वाचले. तसेच अन्य एका व्यक्तीने त्याला काळी विद्या प्राप्त करण्यासाठी निष्पाप मुलाचे रक्त अंगाला लावण्यास सांगितलं. त्यातूनच हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.
तिघांपैकी दोन आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता आणखी कोणी आरोपी आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत.