नागपूर : विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक राज्याचे माजी महाधिवक्ता ऍड. श्रीहरी अणे यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढविला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या काळात गुजरात, तमिळनाडू, ओडिशापर्यंत मराठ्यांचे राज्य होते, असे अणेंनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे तुकडे होऊ देणार नाही, अशी भाषा करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने इतिहास चाळावा, अशा शब्दात त्यांनी ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी १०५ जणांनी मुंबईसाठीच हौतात्म्य पत्करले होते, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून विदर्भ वेगळे झाला पाहिजे. एका भाषेचे अनेक राज्ये आहेत. छोटे राज्य प्रदेशाच्या आणि लोकांच्या दृष्टिकोनातून सोयीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा छोट्या राज्यांचे समर्थक होते. शेतकरी आत्महत्या आणि नक्षलवाद रोखण्यासाठी विदर्भ राज्य झाले पाहिजे, असेही अणे म्हणाले.
महाराष्ट्राच्या निर्मितीच्या काळात मुंबईत ५२ टक्के लोक गुजराती भाषी होते. गुजरातला मुंबई हवी होती. विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला नसता तर मुंबई गुजरातला गेली असती किंवा केंद्र शासित प्रदेश झाला असता. मुंबईसाठीच आंदोलन करण्यात आले होते. यात १०५ जणांना हौतात्म्य आले. हे आंदोलन संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हते, असं ही अणे म्हणाले.