Video -आकाशातून पाहा पालीचा बल्लाळेश्वर

  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची  दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.

Updated: Sep 8, 2016, 09:10 PM IST
Video -आकाशातून पाहा पालीचा बल्लाळेश्वर title=

सिद्धटेक :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची  दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.

खाली व्हिडिओ आहे..

सुशांत श्रीकांत कोयटे, श्रीकांत नारायण झंवर या युवकांच्या झॉन मीडियाने अष्टविनायकांचं आकाशातून दृश्य टिपलं आहेत,  मोरेश्वराचं मोरगाव आणि सिद्धटेकचा सिद्धिविनायकाचे आकाशातून दर्शन घेतले आज आम्ही तुमच्यासाठी पालीच्या बल्लाळेश्वरचे आकाशातून दर्शन  देणार आहोत.

सुशांत श्रीकांत कोयटे आणि श्रीकांत नारायण झंवर हे दोन तरूण मूळ आयटी क्षेत्रातील असून ते अमेरिका आणि इंग्लड या ठिकाणी आयटी क्षेत्रात कार्यरत होते. पण आपल्या देशात आपल्या मातीत काही तरी नवीन करावे या उद्देशाने झपाटून झॉन मीडिया स्थापन केली. कोणत्याही कामाच सुरूवात श्रीगणेशाची वंदन करून केली जाते. त्यामुळे त्यांनी आपला पहिला प्रॉजेक्ट हा गणपतीचाच असला पाहिजे असे ठरविले.

त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या ठिकाणी या दोघांची भटकंती सुरू असून यातून कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन त्यांनी ठेवला नाही. अष्टविनायकाच्या प्रोजेक्टपासून सुरूवात करायची असे सुशांत आणि श्रीकांत यांनी ठरवूले. यासाठी आवश्यक ती सामुग्री घेऊन हे तरूण निघाले अष्टविनायकाला आकाशातून टीपायला.

 

या अवलियांनी अष्टविनायकाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा पहिला व्हिडिओ त्यांनी मोरगावचा मोरेश्वर यूट्यूबवर टाकला. असे मोरगाव आपण कधीच पाहिले नव्हते. झी २४ तासने सुशांत कोयटे आणि श्रीकांत झंवर यांच्याशी संपर्क साधला. आपल्या या अभिनव प्रकल्पाबद्दल ते भरभरून बोलत होते. अमेरिकेतून परतल्यावर काही तरी वेगळं काम करण्याचं आम्ही ठरवलं त्यानुसार हा प्रोजेक्ट हातात घेतला. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्या. अनेकांना विनंती करावी लागली. आमचा कमर्शिअल उद्देश नसल्याचं सांगावं लागलं. मग आम्हांला शुटिंगला परवानगी मिळाली.

या सर्व कार्यात मंदिराच्या ट्रस्टींनी खूप मदत केली. त्यांनी आम्हांला शुटिंगला खूप मदत केली. आकाशातून शुटिंग करताना खूप मजा आली. परदेशात असताना खूप रिसर्च केला होता. यात होल अँड सोल आम्ही आहोत. शुटिंग, एडिटिंग, ग्राफिक्स आणि म्युझिक कम्पोज या सर्व गोष्टी आम्हीच केल्याचे श्रीकांत झंवर यांनी सांगितले.

मूळचे कोपरगावचे असलेले सुशांत कोयटे यांनी अमेरिका पाहिली होती पण कोकणात जाण्याचा त्यांचा कधी योग आला नव्हता. पण अष्टविनायकातील काही गणपती कोकणात असल्याने पहिल्यांदा निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पाहिला आणि कोकणाच्या प्रेमातच पडलो. आम्ही शुटिंग केली त्यावेळी पावसाळा सुरू होता. त्यामुळे शुटिंग करण्यात आणखी मजा आली. आपला देशात असं वातावरण असतं हे कधी विचारही केला नव्हता, असे कोयटे यांनी सांगितले.

 

पालीच्या गणपतीची वेदात स्तुती गायली

वैदे: संस्तुतवैभवो गजमुखो भक्ताभिमानीति यो !

बल्लाळारव्य सुभक्तपाल नरत: ख्यात: सदा तिष्ठती !!

क्षेत्रे पल्लिपुरे यथा कृतयुगे चास्मिस्तथा लौकिके !

भक्तैर्भावितमूर्तीमान गणपती सिद्धीश्वर तं भजे !!

वेदांमध्ये ज्याची स्तुती गायली आहे... ज्याचं मुख गजासारखं आहे... जो भक्ताच्या नावानं प्रसिद्ध आहे... जो आपल्या भक्ताच्या पालनामध्ये मग्न आहे... कृतयुगात पल्लिपूर म्हणजेच पालीमध्ये विराजमान आहे... ज्याची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे असा अष्टविनायकांपैकी एक पाली गावचा श्री बल्लाळेश्वर...

पुराणकथेत उल्लेख पालीचा...

पाली... हे अष्टविनायकामधलं एक स्थान असून गणेश पुराणात त्याचा उल्लेख आणि कथा आहे... बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्री गणेश त्या मुलानं पूजलेल्या शिळेत येऊन राहिले... त्यानंतर बल्लाळ विनायक, बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले...

पालीतील दोन बल्लाळेश्वर मंदिर...

पाली क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम लागतं ते छोटंसं बल्लाळेश्वर मंदिर... त्यात बल्लाळावर प्रसन्न झाली ती भव्य मूर्ती आहे... तिला ढुंढिराज विनायक म्हणतात... ही मूर्ती स्वयंभू आहे... सगळ्यात आधी याठिकाणी दर्शन घेतलं जातं... पूर्वी बाल बल्लाळ आपल्या सवंगड्यासह रानात ज्या मूर्तीच्या भजनपूजनात निमग्र असताना त्याचा बाप कल्याणशेट्टीनं मूर्ती उडवून दिली तीच ही मूर्ती. अशी कथा आहे... पूजाअर्चा करताना प्रथम श्री धुंडीविनायकावर अभिषेक, आवर्तन आणि मग बल्लाळेश्वरीवर अशी प्रथा आहे...

त्यानंतर दुसरं मोठं मंदिर बल्लाळेश्वराचं आहे...'श्री'कारी धाटणीचं हे देऊळ अत्यंत रमणीय असून पूर्वाभिमुख आहे...मंदिर वास्तूकलेचा उत्तम नमुना मानला जातो... सूर्योदय होताच सूर्याचे किरण सभामंडपातून येऊन मूर्तीवर पडतात अशी देवालयाची बांधणी साधलीय...बांधकाम चिरेबंदी असून त्या प्रचंड चि-यांच्या बांधकामात शिसं ओतून भिंती अत्यंत मजबूत केल्यायत...त्यामुळंच त्याचं बांधकाम भूईकोट किल्ल्याप्रमाणं झालंय...कळसाच्या तळाशी दगडी बांधकामाचे सज्जे असून त्याभोवती दगडी कमळाच्या आकाराची महिरप आहे...मंदिराचा कळस अतिशय प्रेक्षणीय असून त्यात एक खोली देखील आहे...

कसा आहे पालीचा मंदिर परिसर

सभामंडपात प्रवेश करतानाच दर्शनी भागात प्रचंड मोठी घंटा दिसून येते...श्रीमंत चिमाजी अप्पांनी ही घंटा वसई किल्ल्यामध्ये फिरंग्यांचा पाडाव करून हस्तगत केली होती...विजयाचं प्रतीक म्हणून चिमाजी अप्पांनी ही घंटा मंदिरास भेट दिल्याचं सांगितलं जातं...

गाभा-यात प्रवेश केल्यानंतर दगडी सिंहासनावर विराजमान असलेली बल्लाळेश्वराची मूर्ती लक्ष वेधून घेते...पूर्वाभिमूख बल्लाळविनायकाची मूर्ती 3 फूट उंचीची पण रुंदट आहे... कपाळाचा काही भाग खोलगट असून मुखभाग चांगलाच स्पष्ट आहे...बाप्पाची सोंड डावीकडे झुकलेली असून बेंबीत आणि डोळ्यात चकचकीत हिरे आहेत... मूर्ती दगडी सिंहासनावर बसलेली असून सिंहासन मूर्तीचे भोवती जडविलेले आहे... मूर्तीचा बेंबीपासूनचा भाग सिंहासनाच्या वर दिसतो...त्यावर रिद्धी-सिद्धी चव-या हलवीत उभ्या आहेत...मूषकाची मूर्ती हातांमध्ये मोदक घेऊन श्रीगणेशाकडे पाहत उभी आहे...

फडणवीसांनी जीर्णोद्धार केला....

मूळच्या लाकडी देवालयाचा जीर्णोद्धार करुन फडणवीसांनी सध्याचं पाषाणी देवालय 1760 च्या सुमारास तयार केलं...सभा मंडपाबाहेर दोन तलाव दिसून येतात... त्यातल्या लहान तलावाला बल्लाळ तीर्थ असं म्हणतात. मंदिराच्या बांधकामासाठी याच तलावामधून दगड काढण्यात आल्याचं सांगितलं जातं...

श्री बल्लाळेश्वर मंदिरात नित्य पूजा, आरती, अभिषेकाचे कार्यक्रम सुरू असतात... संपूर्ण चार्तुमासात प्रवचनाचा कार्यक्रम असतो... प्रत्येक संकष्टी आणि विनायक चतुर्थीस पालखी निघते..

भाविकांसाठी सोई...

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात भक्त निवास बांधण्यात आलंय...याशिवाय मंदिर प्रशासनामार्फत प्रसादालयाची व्यवस्थाही करण्यात आलीय... शिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमही मंदिरामार्फत राबवण्यात येतात... त्यामुळे वर्षभर मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांची वर्दळ असते...

तर असा हा पालीचा बल्लाळेश्वर आणि त्याचा महिमा...निसर्गानं भरभरुन दिलेल्या या गावाची सैर करणं हाही एक अविस्मरणीय अनुभव ठरतो...

कुठे आहे पाली...

सह्याद्रीच्या कुशीत... अंबा नदीच्या काठावर आणि सरसगडाच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गसंपन्न गाव म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातलं पाली गाव...पूर्वी घाट माथ्यावरुन कोकणात उतरताना प्रमुख ठाण्याला पोहचण्यापूर्वी ज्या भागात तळ पडायचा त्याला पाल ठोकणं म्हणायचे...त्यावरूनच गावाला पाली नाव पडलं असावं असं सांगितलं जातं...

ऐतिहासिक नगरी आहे पाली..

श्री बल्लाळेश्वराच्या पाली गावाला धार्मिक वारसा तर आहेच पण सोबतच ऐतिहासिक नगरी म्हणूनही उल्लेख होतो...गावाच्या पूर्वेस मंदिरापासून अगदी दोन किलोमीटरवर शिवकालीन सरस गड आहे. टेहळणी करण्यास सरस म्हणून या गडाचं नाव सरस गड पडलं. सुधागड किल्लाही पालीजवळच आहे...

रामानं जटायुशी युद्ध करुन ज्या ठिकाणी जटायूचे पंख छाटले आणि त्याचा उद्धार केला ते स्थानही पाली जवळच आहे.

भारतामधील प्रमुख गणेश मंदिराच्या प्रतिकृती असणारं प्रसिद्ध 21 गणपती मंदिरही इथून जवळच आहे...

गंधयुक्त पाण्याचे झरे...

पालीपासून चार किलोमीटरवर भूगर्भातून भूपृष्ठावर वाहणारा गंधयुक्त गरम पाण्याचा झरा उन्हेरी गावी आहे...बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणारे भाविक याठिकाणी आवर्जून भेट देतात...

पाली गावाचा संपूर्ण परिसर पावसाळ्यात तर आपल्याला आणखीनच मोहून टाकतो...आध्यात्मासोबतच निसर्गाची सैर घडत असल्यामुळे इथं येणारे भाविकही खूष असतात...

पाली गावात प्रामुख्यानं भाताची शेती केली जाते...सोबतच विविध प्रकारची कडधान्य, भाजीपालाही पिकवला जातो...

पालीच्या आसपासचा परिसर...

पाली आणि आसपासच्या परिसरामधलं हे आहे ग. बा. वडोर हायस्कूल...परिसरातील सर्वात जुनी शाळा...अगदी माफक दरामध्ये याठिकाणी शिक्षण दिलं जातं...विद्यार्थ्यांना गड, किल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी शाळेनं एक भन्नाट कल्पना राबवलीय... विद्यार्थी वर्गात नव्हे तर गड-किल्ल्यात शिकतात...

कुंभार वाडा, गुरव आळी, कासार आळी, खडक आळी अशा कामाच्या स्वरूपानुसार गावात वस्त्या आहे...गेल्या दहा वर्षात मात्र इथलं चित्र झपाट्यानं बदलू लागलंय. गावाची लोकसंख्या वाढत चालली असली तरी शहरांकडे स्थलांतराचं प्रमाणही वाढलंय...गाव अजूनही मुलभूत सोयीसुविधांच्या प्रतीक्षेत आहे...

आध्यात्मासोबतच निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेत भाविकभक्त गण पालीचा निरोप घेतात... आणि म्हणत असतील...

अष्ट विनायक पल्ली क्षेत्री

मंदिर सुंदर पाहूया

श्री बल्लाळाचे घेवून दर्शन

आपण पावन होवूया

बल्लाळाचं नाम घेत या

पल्ली क्षेत्री येवूया

इच्छित मनीचे भक्त जन हो

पूर्ण करोनी घेवू या