गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप!

पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

Updated: Jan 4, 2017, 10:45 AM IST
गुन्हेगारांची कुंडली उघडणार 'चरित्र' अॅप! title=

कपिल राऊत, ठाणे : पोलिसांनी आपला खाक्या दाखवला की सराईत गुन्हेगांराच्याही कुंडल्या जगासमोर येतात. पण, आता मात्र केवळ संशयिताचे नाव समजताच त्या गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 'चरित्र' या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे. 

ठाणे पोलिसांना 'चरित्र' नावाचं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसीत केलंय. याच अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आता ठाणे आणि परिसरातील कोणत्याही गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. 'चरित्र' या अॅप्लिकेशनमध्ये संशयिताचे केवळ नाव टाकल्यास त्याच्यावर यापूर्वी ठाणे आयुक्तालयातील पाचही परिमंडळातील कुठेही गुन्हा दाखल झालेला असल्यास त्याची संपूर्ण माहिती आणि मागील गुन्हे याबाबत संपूर्ण डेटा मिळणार आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी एका खासगी कंपनीच्या मदतीने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. 
       
'चरित्र' या सॉफ्टवेअरमध्ये गुन्हेगारांची माहिती टाकण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरु होते. 'चरित्र'मध्ये ठाणे शहर आयुक्तालयातील 1997 पासूनच्या सर्व गंभीर तसेच अगदी साध्या एनसीपासूनच्या गुन्हेगारांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे 'चरित्र' हे खऱ्या अर्थाने सदरक्षणाय - खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रिद वाक्याला साजेसे होणार आहे.