अमरावती : शहरात नोटबंदी विरोधात काँग्रेसच्यावतीने आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नोटबंदी हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असून याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुख्य मार्गवरुन मोर्च्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. विविध काँग्रेसचे पदाधिकारी आमदारांसह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी अनेक मागण्या करण्यात आल्यात. यावेळी बँकेतील पैसे काढण्यावरील निर्बंध ताबाडतोड हटवण्यात यावेत, 8 नोव्हेंबर पासून पैसे काढेपर्यंत 18 टक्के व्याज देण्यात यावे, कॅशलेस व्यावहारातील चार्जेस बंद करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, मनरेगा कामावरील मजुरांचा पगार दुप्पट करावा अशा मागण्या निवेदनामार्फत करण्यात आल्यात. नोटबंदीनंतर काँग्रेसकडून काढण्यात आलेला पहिलाच मोर्चा होता. 50 टक्के नफावर आधारित भाव देण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. ती तातडीने लागू करावी, अशी मागणी आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले. तसेच प्रहार आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज नंतर सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचं काम करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
नोटबंदीचा आदेश काढल्यानंतर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवेळी नोटबंदी केल्यामुळं सरकारने काय साध्य केलं असा सवाल आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारला. दरम्यान, काँग्रेसची मोर्चाला उपस्थित कमी होती, अशी शहरात चर्चा होती.