रत्नागिरी: गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं... गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात...
कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गण गवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात आणि वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंताची एंट्री होते. दोन वाट्यांवर पाय ठेवून आणि डोक्यावर पेटता दिवा ठेवत हा कलावंत सलामी देतो.. आणि मग याच जाखडीच्या ठेक्यावर हे जाखडी कलावंत.. आकर्षक मानवी मनोऱ्याच्या सहाय्यानं विविध पक्षी-प्राण्यांचे आकार घेत
आपला कलाविष्कार सादर करतात. यानंतर सुरू होते ती गण आणि गवळण... पायाच्या आणि हाताच्या वैशिष्ट्यपूर्ण हालचाली आणि एकमेकांमधील ताळमेळ जाखडीला अधिक आकर्षक बनवतात...
कोकणच्या ग्रामीण भागात जाखडी नृत्याची परंपरा जपणारी घराणी आहेत... त्यांचेही नियम आणि मान ठरलेले आहेत.. कोकणात घराण्याने गाणी रचावी... हल्ली या गाण्यांना नव्या चित्रपटातील गाण्यांची चाल लावली जाते...
काळाच्या ओघात कोकणचा हा सांस्कृतीक ठेवा मागे पडतोय... नवी पिढी या लोककलेपासून दूर जातेय काही भागात ही लोककला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होतायत...
गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आपण कोकणातील कोणत्याही गावात पोहोचलो तर जाखडीचा हा ठेका हमखास कानी पडतो.. फेर धरून जाखडी नाचणाऱ्या कलावांतांभोवती अख्खा गाव जमा होवून त्याचा आनंद घेत असतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.