नागपूर: नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी एकाच मतदारसंघावर दावा केला आहे. गेल्या काही वर्षात या मतदारसंघात आपली ताकत वाढल्यानं आता तो मतदारसंघ आपल्या वाट्याला देण्याची मागणी राष्ट्रवादीनं केलीये. तर ताकद वाढल्याचे पुरावे देण्याचं आव्हान काँग्रेसनं दिलंय.
१९९० पासून गेल्या ५ विधानसभा निवडणुकीत सातत्यानं काँग्रेसचा नागपूर पश्चिम मतदारसंघातून पराभव झाला आहे आणि काँग्रेसच्या नेमक्या याच पराभवाचं भांडवल करत आता राष्ट्रवादी या मतदारसंघाची मागणी करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख याच मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे. तर हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळालाच हवा ही मागणी राष्ट्रवादीच्या आमदारानं रेटून धरली आहे. काँग्रेसच्या त्याच-त्याच उमेदवारांना बघून मतदार कंटाळले असून आता बदलाची गरज असल्याचे ते म्हणाले.
दुसरीकडे राष्ट्रवादीनं आपली ताकद वाढल्याचा दावा कुठल्या भरोशावर केल्याचा प्रश्न काँग्रेस नेते विचारात आहेत. गेल्या ५ विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार सतत पराभूत झाला, असला तरीही या मतदारसंघात काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. पण त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र एकही नगरसेवक या मतदार संघात नाही याची आठवण काँग्रेस नेत्यांनी करून दिली.
दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांनी एकाच मतदार संघावर दावा केल्यानं निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादीचे नेते पुत्र विरुध्द काँग्रेसचे शहराध्यक्ष अशी लढत होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.