डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरु झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना शुक्रवारी डोंबिवलीमध्ये रात्री राडा झाला.
डोंबिवलीतल्या गरीबाचा वाडा या भागातल्या एका चाळीवर रात्री साडे बाराच्या सुमाराला काही लोकांनी शिवसेना समर्थक कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला चढवत गोळीबार केला. भाजप उमेदवार विकास म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केलाय.
तर याच भागात शिवसेना शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. ही तोडफोडही भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. मुख्यमंत्र्यांनी भाजप कार्यकर्त्यांना भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी असल्याचा संकेत दिला. त्यानंतरच रात्री भाजप कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांवर हा हल्ला केला असल्याचा आरोप, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
तर भाजप उमेदवार विकास म्हात्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळताना, हे शिवसेनेचंच षडयंत्र असल्याचा प्रत्त्यारोप केलाय. आपण शिवसेनेत प्रवेश न घेतल्याचा राग मनात धरून आपल्याविरुद्ध हा खोटा बनाव रचल्याचं म्हात्रे यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी मी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी आपला पिच्छा पुरवला होता, असंही म्हात्रेंचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.