रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ले रायगडावरील महादरवाजाचे शिवचरित्रासह इतिहासामध्येही अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्यक्षात मात्र हा ऐतिहासिक महादरवाजा किल्ले रायगडावरती आजवरती कुणीही पाहिला नव्हता. आता मात्र पुरातत्व विभागाने महाकाय महादरवाजा बसविल्याने जगभरातील शिवप्रेमींना आता किल्ले रायगडाचे मुख्यद्वार पाहण्याची संधी मिळणार आहे.
पुरातत्व विभागाने या भव्य दगडी कमानीमध्ये महादरवाजा बसविण्याचा संकल्प दीड वर्षांपूर्वी केला. औरंगाबाद येथील विशेष कारागिरावरती ही कामगिरी सोपविण्यात आली आणि रायगडाला शोभेल असा महादरवाजा घडवण्यात आला.
यासाठी सुमारे अकरा लाख रुपये इतका खर्च करण्यात आला असून सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे.
सोळा फूट उंचीच्या भव्य दिव्य दरवाज्यावर कोरीव नक्षीकाम करून शिवकाळातील महादरवाजाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.