पुणे: घुमानला होणाऱ्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मराठी प्रकाशक परिषदेने घेतलाय. या निर्णयामुळे एकही मराठी प्रकाशक संमेलनाला जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय.
संमेलनासाठी व्यावसायिक संयोजक चालतात तर प्रकाशकांनी व्यायसायिकता पाहिली तर कुठे बिघडलं ? असा प्रश्न या प्रकाशकांनी मांडलायं. महामंडळ आणि संयोजकांनी प्रकाशकांबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी केला आहे.
घुमानमध्ये मराठी भाषिक नसल्यानं तिथं पुस्तकविक्री होणार नाही, प्रकाशकांनी घुमानला जाणं म्हणजे वेळ आणि पैशाचा अपव्यय असल्याचं सांगण्यात येत होतं. यावर तोडगा म्हणून विभागीय संमेलन घ्यावं, असाही मतप्रवाह होता.
घुमान इथं संमेलन घेण्याचं जाहीर झाल्यानंतर या मुद्द्यावरून साहित्य महामंडळ, संमेलनाचे आयोजक आणि प्रकाशक यांच्यात वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटावा म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी मध्यस्थी केली होती. महामंडळ अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला आणि संयोजक संजय नहार यांच्याबरोबर बैठक घेऊन प्रकाशकांचं नुकसान होऊ देणार नाही, असा मुद्दा फुटाणे यांनी मांडला होता. त्यानंतर आजतागायत महामंडळ, संयोजक आणि प्रकाशक यांची संयुक्त बैठक झाली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.