मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका

दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय. 

Updated: May 7, 2016, 08:29 AM IST
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका title=
संग्रहित

लातूर, अमरावती : दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय. 

यवतमाळ जिल्ह्याला झोडपले

वादळवा-यासह आलेल्या पावसाने यवतमाळ जिल्ह्याला झोडपून काढलं. आर्णी, घाटंजी, उमरखेड, महागाव तालुक्यात गारांच्या वर्षावासह, सोसाट्याचा वारा आणि पावसानं कहर केला. यात अनेक घरांवरचे टीनचे पत्रे उडून गेले, तर मोठी झाडं उन्मळून पडली. गेल्या तीन दिवसांपासून दुपार नंतर अचानक आकाशात काळे ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटात वादळाला सुरुवात होत आहे. डाळींब आणि इतर फळबागाही या वादळानं उद्ध्वस्त केल्या. महागाव शहरातल्या पंचायत समिती कार्यालयाचं छत उडून गेल्यानं संपूर्ण रेकॉर्ड ओले झाले. 

गारपिटीमुळे खान्देशात नुकसान

गारपिटीमुळे खान्देशात शेतक-यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गुरुवारी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वा-यांसह गारपीट झाली. जळगावमध्ये या गारपीटीनं केळी, बाजरी, कांदा, लिंब आणि डाळींबांसह इतर फळबागांचं मोठं नुकसान झालंय. योगेश पाटील या १८ वर्षिय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तर मुक्तारसिंग पाटील जखमी झाले. तर माळशेवगे गावात वीज पडून एक गायही मृत्यूमुखी पडली. भडगाव, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर तालुक्यांना गारपीटीचा फटका बसला.

लातूरमध्ये वादळी पाऊस

लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि चाकूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं, विजेचे पोल उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.  निलंगा तालुक्यात वीज कोसळून एक गाय ठार झालीय. 

दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्याला शुक्रवारी दुपारी वादळी वारा, गारपीट आणि जोरदार पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात याचा फटका बसला. यामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून, तर अनेक झाडे आणि विजेचे खांबही उन्मळून पडले. 

वीज कोसळून एक गाय ठार 

निलंगा तालुक्यातील मुबारकपूर येथे वीज कोसळून एक गाय ठार झाली. तर हाडगा-उमरगा येथील ओढे-नाले हे भरून वाहत होते. याठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले.निलंगा तालुक्यातील निटूर, औराद शहाजनी, कासारशिरसी, झरी आणि हलगरा या गावातील वीज पुरवठा विजेचे खांब उन्मळून पडल्यामुळे खंडित झाला होता. चाकूर आणि निलंगा तालुक्यात अर्धा ते एक तासाच्या पावसात गारपीटही झाली. 

चारा छावणीला फटका

अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथे सुरु असलेल्या चारा छावणीला ही वादळी वाऱ्याचा फटका बसला. जनावरांच्या डोक्यावरील शेडनेट उडून गेल्यामुळे जनावरांना उन्हातच उभे राहावे लागले. एकूणच लातूर जिल्ह्यातील निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.