कणकवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट घेतली. ही भेट दहा मिनिटे झाली. मात्र, भेटीत काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. परंतु ही सदिच्छा भेट असल्याने बोलले जात आहे.
राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीनंतर ते आज सिंधुदुर्गात गेलेत. त्यांनी देवगड येथे मच्छिमारांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी त्यांनी राज्याची सत्ता माझ्या हातात द्या आणि मग विकास बघा. विकासासाठी आंतरिक इच्छा, मनापासून तळमळ लागते. मात्र ती नसल्यामुळेच येथील विकास रखडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
माझ्या हातात सत्ता असती, तर महाराष्ट्राच्या मच्छिमारी क्षेत्रात किनाऱ्याला येऊन मच्छिमारी करण्याची परप्रांतीय मच्छिमारांची हिंमत तरी झाली असती का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याला देवगडपासून प्रारंभ झाला. यावेळी सकाळी पडेल कॅंटीन येथे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.