धुळे: कार्तिकी एकादशीनंतर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत मुहूर्त साधत सध्या ठिकठिकाणी तुळशी विवाह होत आहेत. तुळशी विवाहानंतर २६ नोव्हेंबरपासून उपवर मुलामुलींचे विवाह सुरू होतील. यंदा अधिक मासामुळं विवाह मुहूर्तात घट आली आहे. सरासरी साठ विवाह मुहूर्त असून पालकांना सोयीनुसार घटीका आणि गोरज मुहूर्तावर विवाह करता येतील. त्यामुळं सध्या कुंडली लक्षात घेऊन पालक ब्राह्मणांकडे योग्य मुहूर्त शोधू लागले आहेत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार तुळशी विवाहानंतर उपवर मुलामुलींचे विवाह केले जातात. गेल्या चार महिन्यांपासून सर्वत्र विवाह बंद होते. मात्र या काळात पालकांनी आपल्या उपवर पाल्यांसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचं काम केलं. इच्छित स्थळ निश्चित झाल्यानंतर पालकांना तुळशी विवाहाची प्रतीक्षा होती. कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह होतात. घरोघरी आणि शक्यतो ज्यांच्या घरी यंदा कर्तव्य आहे अशांनी गोरज मुहूर्तावर उसाचा मांडव घाल्रून तुळशी विवाह घडविलं. येणार्या काळात उपवर मुलामुलींचे विवाह होणार आहेत. यंदा अधिकमास आणि त्यातील कोकीळ व्रत यामुळं विवाह मुहूर्त नाहीत.
साधारणपणे २६ नोव्हेंबर ते १२ जून या काळात साठ विवाह मुहूर्त आहेत. शहरातील सुजित राव यांनी दिलेल्या माहितीनुसार २२ नोव्हेंबरपर्यंत शुक्राचा अस्त असल्यानं विवाह मुहूर्त नाहीत. कारण या काळात शुक्राचं बळ मिळत नसल्यानं विवाह होत नाहीत. पण २६ नोव्हेंबरपासून गुढी पाडव्यापर्यंत ३४ विवाह मुहूर्त आहेत. गुढी पाडव्यानंतर चातुर्मासाला सुरुवात होईपर्यंत म्हणजेच १२ जूनपर्यंत विवाहासाठी २२ मुहूर्त आहेत, असं राव यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.