भंडारा : भंडा-याच्या तुमसरमधल्या उमरवाडामध्ये राहणा-या ६५ वर्षीय चंद्रभागा किरणापुरे यांची सध्या गावात जोरदार चर्चा सुरु आहे. त्याला कारणही तसंच आहे. या महिलेने चक्क आपल सौभाग्यलेणं गहाण ठेवून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिलाय. त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवून शौचालय बांधलंय आणि स्वच्छतेचा नवा आदर्श उमरवाडा गावासमोर ठेवलाय.
गावात अनेक कुटुंबांकडे शौचालयांची सुविधा नसल्यामुळे गावक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. हाच त्रास कमी व्हावा यासाठी चंद्रभागा किरणापुरेंनी पतीचा नकार असतानाही शौचालय बांधण्याचा विडा उचलला आणि स्वत:चे दागिने गहाण ठेवून तसंच कर्ज काढून शौचालय उभारलं.
यासंदर्भात उमरवाडाच्या उपसरपंचांना विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं (पैसे शब्दच उद्गारला नाही...नाही तर मदत केली असती). खरं तर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावात शौचालय बांधण्याची योजना आहे. पण त्यासाठी ग्रामस्थानं आधी ते स्वखर्चानं बांधावं लागतं. पण चंद्रभागा किरणापुरेंकडे पैसेच नव्हते. या तांत्रिक अडचणीबाबत सरकारी अधिका-यांना विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं...
उमरवाडामध्ये ३८८ शौचालयं मंजूर झाली पण केवळ ११० च शौचालयच बांधण्यात आली. ज्या गावक-यांकडे पैसे आहेत तेच गावकरी शौचालयं बांधू शकतील पण बहुतांश ग्रामस्थांकडे मुबलक पैसा नसतो. त्यामुळे या योजनेपासून अजून अशा किती चंद्रभागा किरणापुरे अलिप्त राहतील हा खरा प्रश्न आहे.