www.24taas.com, ठाणे
निवडणूक आयोगानं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दडपणाखाली काम करू नये असं टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडलं आहे. यावेळी राज युती आणि आघाडीवरही बरसले. युती आणि आघाडीनं ठाण्याची वाट लावल्याची टीका राज यांनी केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगावर घणाघाती टीकास्त्र सोडलं. महानगरपालिका निवडणुकीत तिकीटं देताना पक्षातील आधीच्या लोकांना प्राधान्य देण्यात येईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.
परीक्षा दिल्याशिवाय कोणालाही उमेदवारी देण्यात येणार नाही. काम करू शकेल, खरं काही तरी करून दाखवतील अशांनाच मी उमेदवारी देणार आहे. नुकतेच काही पोसायचं नाही मला, असे राज ठाकरे यांनी ठाणे येथील उमेदवारांबद्दल बोलताना सांगितले.
ठाणेकरांनी युतीला वारंवार सत्ता दिली आहे, कारण ठाणेकरांसमोर पर्याय नव्हता. ज्या वेळेला लोकांसमोर पर्याय उभा राहतो, त्यावेळी लोकं तो पर्याय स्वीकारतात. कोणताही ठाणेकर युतीच्या कारभारामुळे समाधानी नाही, त्यामुळे हाच मुद्दा घेऊन मी निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद आणि महापालिकेचा निकाल एकाच दिवशी जाहीर करावा या संदर्भात तुमची भूमिका काय असे राज ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, माझी पण तीच भूमिका आहे. मीच तर एकनाथ खडसेंना फोन केला होता. त्यानंतर नीला सत्यनारायणन यांच्याशी माझं बोलणं झालं. काही तरी मशीन गोळा करण्याचं काम सुरू आहे. पण दोन वेगवेगळ्या दिवशी निकाल जाहीर करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. दोन्ही निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर करता येतात. जिल्हा परिषदांची तारीख मार्चमध्ये संपते, म्हणजे तुम्हांला घाई काय लागली आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
[jwplayer mediaid="30590"]