www.24taas.com, नालासोपारा
नालासोपा-यात टोल नाका नागरिकांची डोकेदुखी ठरतोय. दररोज हजारो रुपयांच्या घरात टोल कर जमा होत असूनही या रस्त्यांची दूरवस्था मात्र कायम आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाश्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
नालासोपा-यातील मुंबई हायवेला जोडणारा हा टोल नाका प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरतोय. सध्या या ठिकाणी टोलच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरु आहे. टोल वसूली करण्याच्या नावाखाली काही कर्मचारी फक्त आपला खिसा भरताना दिसतात. मात्र कित्येक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था आहे तशीच आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून पावसाळ्यात प्रवास करताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर व्हावं अशी माफक अपेक्षा जीव मुठीत घेउन जाणारे वाहनधारक करताहेत.
टोलच्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र रस्ता खराब असल्या कारणानं वाहनधारक टोल न भरताच निघून जातात असं कंत्राटदारांचं म्हणणंय. टोल आणि रस्त्याच्या समस्येनं नागरिक त्रासलेले असतांना राजकारणी मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतायेत.. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय.
[jwplayer mediaid="23377"]